मैदानावरील तास, देणार १० गुण!
By Admin | Published: June 20, 2016 03:53 AM2016-06-20T03:53:56+5:302016-06-20T03:53:56+5:30
प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानावर खेळण्यासाठी किमान १ तास दिला, तर त्या मुलाला शाळेत १० गुण देण्यासाठी प्रयत्न करू, अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
मुंबई : प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानावर खेळण्यासाठी किमान १ तास दिला, तर त्या मुलाला शाळेत १० गुण देण्यासाठी प्रयत्न करू, अशी घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. दादर, शिवाजी पार्क येथील ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने आयोजित केलेल्या ३२ व्या समर्थ पावसाळी मल्लखांब शिबिराचे उद्घाटन क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या वेळी समर्थच्या मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांनंतर तावडे म्हणाले की, ‘प्रत्येक विद्यार्थी किमान १ तास मैदानावर खेळण्यासाठी उपस्थित असल्यास, त्याला शाळेत १० गुण अतिरिक्त द्यायला हवेत, तसेच विविध खेळांमधील चांगल्या खेळाडूंसाठी मोठ्या संख्येने चांगल्या नोकऱ्याही निर्माण झाल्या पाहिजेत व मी स्वत: प्रयत्न करेन,’ असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
‘मैदानावर सराव केला, तरच खेळाडू तयार होतील, शिवाय मुले मोबाइल व टीव्हीपासून आपसूकच दूर होतील. खेळाडू आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर त्याची खेळात नक्कीच चांगली प्रगती होते. खेळाडंूना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे आश्वासन तावडे यांनी या वेळी दिले.
मल्लखांबातील पहिले छत्रपती पुरस्कार विजेते व सध्या मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्यवाह दत्ताराम दुदम हेदेखील समारंभाला उपस्थित होते. या शिबिरात ३२५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. करंजगाव, तसेच कोठुरे, निफाड, नाशिक येथील १२ तर कलाकार ट्रस्ट, दिल्ली या संस्थेतील २ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षकांचा सत्कार
समर्थचे ज्येष्ठ आजीव सभासद व ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक सुधाकर देखणे आणि त्यांच्या पत्नी आशाताई देखणे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन खास सत्कार करण्यात आला. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील कार्यरत असलेल्या देखणेसरांनी, समर्थचे संस्थापक व्यायाम महर्षी प्र. ल. काळेगुरुजी यांनी दिलेल्या व्यायामाच्या बाळकडूला सर्व श्रेय दिले.