अतिक्रमणाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला

By Admin | Published: May 20, 2016 01:32 AM2016-05-20T01:32:32+5:302016-05-20T01:32:32+5:30

गेटवर बेकायदेशीरपणे लावलेले कुलूप काढायला सांगितल्याच्या रागामधून सोसायटीच्या सभासदांच्या अंगावर मोटार घालून प्राणघातक हल्ला करण्यात आला

Fierce attack due to encroachment | अतिक्रमणाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला

अतिक्रमणाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला

googlenewsNext


पुणे : सोसायटीच्या मालकीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून गेटवर बेकायदेशीरपणे लावलेले कुलूप काढायला सांगितल्याच्या रागामधून सोसायटीच्या सभासदांच्या अंगावर मोटार घालून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना ५ मे रोजी सातारा रस्त्यावरच्या आदिनाथ सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ‘मानकर डोसा’च्या संतोष शंकर मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी असित शहा (वय ६५, रा. महर्षीनगर, सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. शहा आदिनाथ सोसायटीचे कमिटी सदस्य आहेत. सातारा रस्त्यावरच्या आदिनाथ सोसायटीमध्ये एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये काही गाळे आहेत. यातील एक गाळा मोरे यांचा असून, त्यामध्ये ते ‘मानकर डोसा’ नावाने खाद्यपदार्थांचे दुकान चालवतात. सोसायटीच्या मालकीचे ३ हजार चौरस फुटांच्या जागेवर अतिक्रमण झालेले आहे. यासोबतच विश्वकमल लॉजशेजारील रस्ता या अतिक्रमणांमुळे बंद करावा लागला आहे. सोसायटीने या रस्त्याच्या गेटवर कुलूप लावलेले आहे. या कुलपावर मोरे यांनी स्वत:चे कुलूप लावल्याचे शहा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याठिकाणी झालेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्यासाठी सोसायटीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन पाहणी केली. या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत असताना मोरे मोटार घेऊन तेथे आले. भरधाव आलेली मोटार त्यांनी शहा यांच्यासह अन्य सदस्यांच्या अंगावर घालत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत सर्व जण बाजूला पळाल्यामुळे बचावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यासंदर्भात सर्व सदस्यांनी सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशानंतर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक माणिक डोके करीत आहेत.

Web Title: Fierce attack due to encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.