देहरंगमध्ये पंधरा दिवसांचा पाणीसाठा
By Admin | Published: June 6, 2017 02:26 AM2017-06-06T02:26:36+5:302017-06-06T02:26:36+5:30
पनवेल महानगरपालिकेने केलेल्या उत्तम नियोजनामुळे देहरंग धरणात अद्याप जवळपास पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे.
अरूणकुमार मेहत्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने केलेल्या उत्तम नियोजनामुळे देहरंग धरणात अद्याप जवळपास पंधरा दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत टंचाई भासणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.
दीड महिन्यापासून धरणातून दररोज दहा एमएलडी पाणी घेतले जात आहे. तीन दिवस रोज आणि इतर वेळी दिवसाआड पाणीपुरवठा करून प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. ते एमएजेपीकडून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होत नसताना त्यामुळे पनवेलकरांना यंदा फारसे टंचाईला सामोरे जावे लागले नाही.
पनवेल महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून जुलै ते मार्च महिन्यांत १० ते १२ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर उर्वरित पाणी एमजेपी आणि एमआयडीसीकडून घेण्यात येते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा महापालिकेला पाण्याचा मुख्य स्रोत आहे, त्याशिवाय पनवेलकरांची तहान पालिका प्रशासन भागवू शकत नाही; परंतु एमजेपीची वाहिनी जीर्ण झालेली असल्याने तिला फुटीचे ग्रहण लागले आहे. तसेच टाटा पाँवर कंपनीकडून सुट्टीच्या दिवशी पाताळगंगा नदीत पाणी सोडले जात नसल्याने पात्रात पाण्याची कमरता भासत आहे. यामुळे एमजेपीला मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करता येत नाही. त्यामुळे शहरवासीयांनासुद्धा पूर्वीप्रमाणे मुबलक पाणी देता येता नाही. पनवेल शहराला सुमारे २७ एमएलडी पाण्याची गरज आहे. आजघडीला एमजेपी आणि एमआयडीसीकडून प्रत्येकी ८ आणि ७ एमएलडी पाणी प्राप्त होत आहे. म्हणजे एकूण १५ एमएलडी पाणी बाहेरून प्राप्त होत आहे. त्याच पाण्यावर पनवेलकरांची तहान भागविण्यात येत होती. झोन करून दिवसाआड पाणी देण्यात येत होते. एप्रिल महिन्यात तीन दिवस नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला.
मंगळवार, बुधवार, गुरुवार दररोज पाणी दिले जातेय, याअगोदर पनवेलकरांना दिवसाआड पाणी दिले जात होते. २५ एप्रिलपासून तीन दिवस नियमित म्हणजेच दररोज पाणी देण्यास सुरुवात झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देहरंग धरणाचे पाणी बचत करून ठेवून त्याचा वापर उन्हाळ्यात, त्याचबरोबर एमजेपीच्या शटडाउनच्या काळात करण्याचे धोरण आखण्यात आले होते. त्यानुसार धरणात साडेचारशे एमएलडी पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या सव्वामहिन्यापासून दहा एमएलडी पाणी देहरंगमधून घेतले जात आहे. तीन दिवस २७ ते २८ एमएलडी पाणी पनवेल शहरात देता येत आहे. चार दिवस १७ ते १८ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही अद्याप पंधरा दिवस पुरेल म्हणजे, दीडशे एमएलडीपेक्षा जास्त पाणीसाठा धरणात शिल्लक असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.