पंधरा वर्षापासून निराधारांचे मानधन जैसे थे !
By admin | Published: November 27, 2015 01:38 AM2015-11-27T01:38:38+5:302015-11-27T01:38:38+5:30
राज्यात २७ लाख निराधार
विवेकानंद ठाकरे / रिसोड (जि. वाशिम) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिल्या जाणार्या अनुदानात गत पंधरा वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आली नाही. महागाईच्या काळात ६00 रुपयावरून एक हजार रुपये मानधन मिळावे म्हणून निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. भूमिहीन, निराधार लाभार्थींना उतारवयात आर्थिक मदतीचा हात म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे संजय गांधी निराधार योजना, ङ्म्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ आदी योजना शासनाने सुरू केल्या आहेत. प्रारंभी या योजनेचे मानधन दर महिना केवळ ७५ रुपये होते. त्यानंतर १५0 रुपये, २२५ रुपये, ३५0 रुपये अशी मानधनात टप्याटप्याने वाढ होत गेली. १९९३ मध्ये मानधन ५00 रुपयांवर पोहचले. २000 साली १00 रुपयांची वाढ केल्याने मानधनाचा आकडा ६00 रुपयावर गेला. त्यानंतर मानधनात कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात आली नाही. गत चार-पाच वर्षांपासून महागाईने कळस गाठला आहे. महगाईच्या काळात निराधारांना ६00 रुपयाचे अनुदान तोकडे असून हे मानधन वेळेवर मिळेल याची कुठलीच खात्री नाही. महसूल विभागाच्या नोंदीनुसार राज्यात २७ लाख निराधार आहेत. मानधनात वाढ आणि दरमहा मानधन मिळावे, अशी निराधार लाभार्थ्यांची मागणी आहे. महागाई वाढत चालल्याने मानधनातही वाढ होणे गरजेचे आहे. निराधार लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मानधन असावे. हा प्रश्न शासनदरबारी मांडणार आहे.