महाविकास आघाडीमुळे पंधरा वर्षांनी सख्खे वैरी बनले पक्के मित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 10:03 AM2019-12-25T10:03:20+5:302019-12-25T10:08:03+5:30
महाविकास आघाडीने दोघांचे मनोमिलन घडवून माजी आमदार प्रवीण भोसले आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना एकाच व्यासपीठावर आणले.
रत्नागिरी ( सावंतवाडी ) : एकेकाळी ज्याच्याशिवाय सावंतवाडीतील राजकारणाचे पानही हालत नव्हते, असे दोन सख्ये मित्र पंधरा वर्षापूर्वी पक्के वैरी बनले होते. मात्र, महाविकास आघाडीने दोघांचे मनोमिलन घडवून माजी आमदार प्रवीण भोसले आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना एकाच व्यासपीठावर आणले. त्यामुळे अनेकांना सुखद धक्का बसला आहे. तर यावेळी भोसले यांनीही आपला वाद संपल्याचे जाहीर करत पुन्हा एकदा आम्ही सावंतवाडीचे राजकारण एकत्र करू, असा विश्वास दिला आहे.
निमित्त होते ते महाविकास आघाडीचे उमेदवार खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या प्रचारार्थ कार्यालयाचा शुभारंभ. या कार्यालयाचा शुभारंभ सावंतवाडी येथील वसंत प्लाझामध्ये झाला. यावेळी आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, युवा नेते संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश गवस, उदय भोसले, सत्यजित धारणकर, सुधीर मल्हार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजू नाईक, विक्रांत सावंत आदी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व आमदार दीपक केसरकर हे एकेकाळी एकमेकांचे मित्र होते. राजकारणात देखील या दोघांनी एकत्र काम केले. पण मध्यंतरी राजकीय कारणांमुळे ते दुरावले होते. पंधरा वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर असलेली ही मंडळी नंतर काळाच्या ओघात वेगवेगळ्या पक्षात निघून गेली होती. मात्र, आता महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या धोरणानुसार सावंतवाडी नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुडतरकर यांच्या प्रचारार्थ हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत.
यावेळी भोसले म्हणाले, राज्यात आघाडी निर्माण करण्याचे शरद पवार यांचे धोरण यशस्वी होत असून झारखंडचा निकाल देखील या आघाडीचा विजय आहे. शिवसेनेने कधी शासकीय पदे स्वीकारली नव्हती. परंतु राज्य मजबूत करण्यासाठी पवार यांच्या आग्रहाखातर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले असल्याचे भोसले म्हणाले.
सुज्ञ जनतेने कायमच चांगले विचार स्वीकारले
माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, वाईट शक्तींना सावंतवाडी शहरातील मतदारांनी कधीही स्वीकारले नाही. बापूसाहेब महाराज व शिवराम राजे भोसले यांचा सुसंस्कृत आदर्श असलेल्या या शहरातील सुज्ञ जनतेने कायमच चांगले विचार स्वीकारले आहेत. प्रवीण भोसले यांनी जातीवादी धर्माध पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी ही महाविकास आघाडी निर्माण झाल्याचे सांगितले. विकास सावंत यांनी जिल्हा काँग्रेसच्या बाबू कुडतरकर यांनाच पाठिंबा असल्याचे जाहीर करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुडतरकर यांच्या प्रचारार्थ काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.