तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल बंद होणार
By admin | Published: November 19, 2016 02:57 AM2016-11-19T02:57:43+5:302016-11-19T02:57:43+5:30
तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल तत्काळ बंद करावा या मागणीसाठी रहिवाशांनी भव्य मोर्चा काढण्याची तयारी केली
नवी मुंबई : तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल तत्काळ बंद करावा या मागणीसाठी रहिवाशांनी भव्य मोर्चा काढण्याची तयारी केली होती; पण महापौर सुधाकर सानावणे यांनी रहिवाशांची भेट घेऊन डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा रद्द करण्यात आला. महापौरांसह माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पर्यायी जागेचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल तत्काळ बंद करण्याची मागणी केली. डंपिंग बंद होईपर्यंत कामकाज चालू न देण्याचा निर्णय घेतल्याने सभा तहकूब करावी लागली होती. यानंतर शुक्रवारी तुर्भे स्टोअर्समधील हजारो नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली होती. यामुळे महापौर सुधाकर सोनावणे, सभागृह नेते जयवंत सुतार, राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी नागरिकांची भेट घेतली. महापालिकेने डंपिंग ग्राऊंडवरील पाचवा सेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायी जागेसाठीची फाईल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. याविषयी तत्काळ निर्णय घेतला जावा यासाठी कोकणभवनमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यांना नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या भावनांची माहिती देण्यात आली. मंत्र्यांनीही याविषयी तत्काळ निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे महापौरांनी नागरिकांना सांगितले. तुमची मागणी मान्य झाली असल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात यावे असे आवाहन केले. या आवाहनानंतर नागरिकांनी आंदोलन स्थगित करून दिलेल्या आश्वासनांची लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डंपिंग ग्राऊंडच्या पाचव्या सेलची क्षमता संपली असल्यामुळे व कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी डंपिंग हटाव मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला शिवसेनेसह इतर पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. महापालिका मुख्यालयावर मोर्चा घेऊन व सर्वसाधारण सभेतही आवाज उठविला होता. नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर महापालिकेने पाचवा सेल तत्काळ बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)
>सुटकेचा श्वास सोडला
तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल बंद करण्यात येणार असून लवकरच पर्यायी जागा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौरांनी देताच नागरिकांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले. दुर्गंधी व प्रदूषणापासून सुटका होणार असल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.
>डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा मिळावी यासाठीची फाईल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. पर्यायी जागा लवकर मिळावी यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
- सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई
>तुर्भे डंपिंग ग्राऊंडच्या पाचव्या सेलमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. क्षमता संपलेला सेल बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. महापौरांनी सेल बंद करण्याचे व महसूलमंत्र्यांनी पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
- सुरेश कुलकर्णी