पाचवीतील विद्यार्थी बनतोय '' अॅप मास्टर''
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 14:00 IST2019-07-08T13:47:30+5:302019-07-08T14:00:27+5:30
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्याचे प्रेरणास्थान असल्याने त्यांचाच जीवनप्रवास उलगडणारे पहिले अॅप त्याने बनविले.

पाचवीतील विद्यार्थी बनतोय '' अॅप मास्टर''
पुणे : प्रत्येकाच्या हातात आता स्मार्ट फोन असून त्यात विविध प्रकारची अॅप डाऊनलोड केलेली असतात. ही अॅप विकसित करणे तितकेसे सोपे नसते. पण पाचवीतील एका विद्यार्थ्याने अनेक प्रकारची अॅप बनवून आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्याचे प्रेरणास्थान असल्याने त्यांचाच जीवनप्रवास उलगडणारे पहिले अॅप त्याने बनविले. तर आतापर्यंत गेम्स, आरोग्य, शिक्षणासह विविध घटकांशी संबंधित ३० हून अधिक अॅप त्याने बनविले आहेत.
सफल सावंत असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सध्या नांदेड सिटीमधील पवार पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत आहे. त्याचे वडील संजय सावंत हे आयटी क्षेत्रामध्ये असल्याने सफल यालाही लहानपणापासून या क्षेत्राची ओढ आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीमध्ये त्याने अॅप बनविणे, तसेच इतर प्रोग्रामिंगची ऑनलाईन माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यामध्ये त्याने अॅप बनविण्याचे धडे गिरविले. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी त्याच्या मनात खुप कुतूहल आहे. ते आपले प्रेरणास्थान असल्याचे तो सांगतो. त्यामुळे पहिले अॅप त्यांच्या जीवनावरच बनविण्याचा निर्णय त्याने घेतला. डॉ. कलाम यांची काही पुस्तके त्यांने वाचली होती. तसेच इतर पुस्तके व माध्यमांतून त्याने माहिती एकत्रित केली. या माहितीचा वापर करून त्याने अॅप बनविले आहे.
हे अॅप नुकतेच गुगल प्ले स्टोअरवर आले आहे. त्यामध्ये कलाम यांचा जीवनप्रवास, त्यांचे प्रेरणादायी विचार, पुस्तके, यशस्वी प्रकल्प, पुरस्कार, उल्लेखनीय कामांचा समावेश करण्यात आला आहे. या अॅपचे नुकतेच लोकार्पणही करण्यात आले . या अॅपप्रमाणेच त्याने काही गेम्स, कॅलक्युलेटर, शाळा निकाल सिस्टीम, आंब्याची ऑनलाईन ऑर्डर, आरोग्य यांसह विविध प्रकारची ३० हून अधिक अॅप बनविली आहेत. त्यासाठी वडिलांसह शाळेमधूनही त्याला सहकार्य करण्यात आले, असे संजय सावंत यांनी सांगितले.
-------------