पाचवीचा वर्ग जोडणार प्राथमिक शाळेला, शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:42 AM2020-09-01T04:42:20+5:302020-09-01T04:42:42+5:30
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी १३ जुलैला शिक्षण खात्याच्या अपर मुख्य सचिवांना हा प्रस्ताव दिला. विशेष म्हणजे तब्बल दीड महिन्यानंतर हा अहवाल आयुक्त कार्यालयातून फुटला आणि शिक्षक संघटना जाग्या झाल्या. न
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : सर्व शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी जुलैमध्ये शासनाला सादर केलेला प्रस्ताव आॅगस्टमध्ये फुटला असून या प्रस्तावाने शिक्षकांची झोप उडविली आहे. प्रस्तावातील सुधारित निकषामुळे उच्च प्राथमिक स्तरावर अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे.
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी १३ जुलैला शिक्षण खात्याच्या अपर मुख्य सचिवांना हा प्रस्ताव दिला. विशेष म्हणजे तब्बल दीड महिन्यानंतर हा अहवाल आयुक्त कार्यालयातून फुटला आणि शिक्षक संघटना जाग्या झाल्या. नव्या प्रस्तावानुसार प्रति विद्यार्थी शिक्षक पदे मंजूर करताना विद्यार्थी संख्या वाढणार आहे. आतापर्यंत जेथे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पद मंजूर होते, तेथे ३५ विद्यार्थ्यांची गरज भासणार आहे.
पद निश्चितीचा असा आहे प्रस्ताव
पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या माध्यमिक शाळेत १७५ विद्यार्थी संख्येपर्यंत पाच पदे मिळतील. १७५ च्या पुढे प्रति ३५ विद्यार्थ्यांमागे एक अशी शिक्षक पदे अनुज्ञेय ठरतील. आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळांना १०५ विद्यार्थ्यांपर्यंत तीन पदे आणि त्यापुढे प्रति ४० विद्यार्थ्यांमागे एक या प्रमाणात शिक्षक मिळतील.
पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळेत मात्र ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हा निकष कायम असेल. मात्र दोनशे पटसंख्येशिवाय मुख्याध्यापक पद मिळणार नाही. दोनशेच्या पुढे प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर होईल. सहावी ते आठवी वर्ग असलेल्यांना ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर केला जाईल.
शारीरिक शिक्षण शिक्षकांना आनंद : २०१४-१५ च्या संचमान्यतेतून शारीरिक शिक्षकांना वगळले होते. त्या पुढच्या वर्षी त्यांचा विशेष शिक्षक दर्जा काढून घेतला. मात्र आता आयुक्तांच्या नव्या प्रस्तावानुसार शारीरिक शिक्षण शिक्षकांना संचमान्यतेत स्थान मिळणार आहे.