इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती; पोलिसांच्या बदल्यांबद्दल पाचव्यांदा ‘तारीख पे तारीख’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 04:08 AM2020-10-16T04:08:19+5:302020-10-16T07:04:43+5:30
गृह विभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळपास ८५ टक्के बदल्या, बढत्यांचे काम झाले आहे. मात्र निरीक्षक व उपअधीक्षकांच्या पदोन्नतीचे काम पावणेदोन वर्षांपासून रखडले
जमीर काझी
मुंबई : पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ कायम आहे. यंदाच्या बदल्यांसाठी गुरुवारी तब्बल पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली. ३० ऑक्टोबरपर्यंत कालावधी वाढविण्यात आला आहे. दसऱ्यानंतरच आता त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली. गृह विभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळपास ८५ टक्के बदल्या, बढत्यांचे काम झाले आहे. मात्र निरीक्षक व उपअधीक्षकांच्या पदोन्नतीचे काम पावणेदोन वर्षांपासून रखडले, तर महासंचालक स्तरावरील उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या बदल्यांनाही मुहूर्त मिळाला नाही. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी त्याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे मुदत उलटूनही आयुक्तालय, परिक्षेत्र व अधीक्षक कार्यालयात अनेक अधिकारी कार्यरत आहेत. तर नागपूर, नक्षलग्रस्त व साईड ब्रँचला अनेक जण अडकून पडले आहेत. बदल्यांसाठीच्या चौथ्यांदा मुदतवाढीच्या आदेशात १५ ऑक्टोबरपर्यंत डेडलाईन होती.
आज अखेरच्या दिवशी ‘डीजी गॅझेट’ निघेल अशी संबंधितांना अपेक्षा होती. मात्र, डीजींनी निर्णय घेतला नाही. प्रकृती ठीक नसल्याने डीजी कार्यालयात आले नसल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा ३० ऑक्टोबरपर्यंत बदल्यासांठी मुदत वाढविल्याचे अध्यादेश गृह विभागाने जारी केले.