अण्णांच्या मौन व्रताचा पाचवा दिवस, सरकारचे अद्याप दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 12:37 PM2019-12-24T12:37:15+5:302019-12-24T12:38:35+5:30
विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून राळेगणसिध्दी मौन आंदोलन सुरु केले आहेत.
अहमदनगर: निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, या व इतर विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून राळेगणसिध्दी मौन आंदोलन सुरु केले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून सरकारकडून मात्र कोणतीही हालचाल दिसत नाही.
देशभरात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र या प्रकरणातील अनेक निकाल वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुध्दा आरोपींना अद्यापही फाशी देण्यात आली नाही. या दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी महिला व युवतींवरील अत्याचार करणा-या नराधमांचे धाडस वाढत आहे. असे प्रकार हे दुर्दैवी असल्याचे आरोप अण्णांनी केला आहे.
तर २०१२ पासून संसदेत ज्युुडीसीईल हा कायदा प्रलंबित आहे. तो कायदा झाल्यास न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तातडीने सुटण्यास मदत होईल. पोलीस ठाण्यात महिलांना एखादी तक्रार दाखल करायची झाल्यास तेथे पुरुष कर्मचारी, अधिकारी असल्याने महिलांना माहिती सांगण्यात अडचणी येतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी महिला कर्मचारी, अधिकारी यांना नेमण्यात यावे. राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
आपल्या विविध मागणीसाठी अण्णांनी राळेगणसिध्दी येथे मौन आंदोलन सुरु केले आहे. मात्र आंदोलन सुरु करून पाच दिवस उलटले असताना सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर सरकारने लवकरात-लवकर तोडगा काढला नाही तर गावकऱ्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे.