पाचवी, आठवीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:17 PM2019-12-12T13:17:19+5:302019-12-12T13:22:24+5:30
शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसेल तर परीक्षा का द्यावी?
पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना आहे. तसेच पाचवीतील शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसेल तर आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा का द्यावी? असा सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्याच्या शिक्षण विभागातर्फे पूर्वी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण विभागाकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. इयत्ता चौथी व सातवीचे वर्ग प्राथमिक शिक्षण विभागाकडे होते. त्यावेळी आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र व्हावेत यासाठी प्राथमिक शिक्षकांकडून प्रयत्न केले जात होते. परंतु, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यास सुरूवात झाली. त्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. त्यात आता विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील पाचवीच्या १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना तर १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, इयत्ता आठवीसाठी केवळ १३ ते १४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र होत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा देवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड नियमानुसार केली जाते. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्याचे बँक खात्याची माहिती व आधार क्रमांक आदी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांकडून ँ३३स्र://६६६. ी४िङ्मल्ल’्रल्ली२ूँङ्म’ं१२ँ्रस्र.ूङ्मे या संकेस्थळावर भरली जाते. त्यानंतरच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यास सुरूवात होते. मात्र, बँकेचा आएएफसी कोड किंवा खाते क्रमांक चुकीचा भरला गेला तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही, असे शिक्षण विभागातील अधिकाºयांनी सांगितले.
/...........
राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. तसेच परीक्षा निकाल जाहीर करून शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाला सादर केली जाते. पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याचे काम माध्यमिक शिक्षण विभागाकडून केले जाते.- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद ,पुणे.
...........
अचूक माहिती भरून दिल्यानंतर रक्कम मिळणार
अभ्यास करून पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्यानंतरही शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसेल तर आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा का द्यावी, असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्यापूर्वी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी अपेक्षा परीक्षा परिषदेच्या अधिकाºयांकडून व्यक्त केली
जात आहे.
..........
शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यावर जमा होत नसल्याच्या काही तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. प्रामुख्याने बँक खात्याची चुकीची माहिती संकेतस्थळावर भरल्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही. परंतु, संबंधित विद्यार्थ्यांची योग्य माहिती भरून द्यावी, याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. अचूक माहिती भरून दिल्यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास सुरूवात होईल.- गणपत मोरे, माध्यमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
.....
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत
यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
वर्ष इयत्ता पाचवी उत्तीर्ण विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
२०१७ ५,४५,९४० १,१२,९७३ १६,३०८
२०१८ ४,८८,८८६ १,०८,५६० १६,५९३
२०१९ ५,१२,७६३ १,०९,२३० १६,५७९
..........
आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा
वर्ष इयत्ता आठवी उत्तीर्ण विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
२०१७ ४,०३,३५९ ५२,६१६ १३,७५५
२०१८ ३,७०,२४३ ४५,१०३ १३,७५९
२०१९ ३,५३,३६८ ६३,२३६ १४,८१५