यवतमाळ येथील साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 07:00 AM2018-10-26T07:00:00+5:302018-10-26T07:00:00+5:30
साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत.
पुणे : घटनादुरुस्तीत नमूद केल्याप्रमाणे साहित्य महामंडळाकडे सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांच्याकडून नावे प्राप्त झाली असून, २८ आॅक्टोबर रोजी होणार असलेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. साहित्य संस्थांनी सुचवलेल्या नावांमध्ये प्रभा गणोरकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांचा समावेश आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या नऊ दशकांच्या इतिहासात अध्यक्षपदी महिला साहित्यिका विराजमान होणार का, याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला जाणार नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने एका नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदोर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी २०१८ सालच्या यवतमाळ येथील संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळयात पडणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना.धों.महानोर ही नावे पाठवण्यात आली आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाकडून डॉ. बाळ फोंडके, प्रेमानंद गज्वी आणि रामदास भटकळ, विदर्भ साहित्य संघाकडून डॉ. प्रभा गणोरकर आणि किशोर सानप, छत्तीसगडकडून प्रेमानंद गज्वी, गोमंतककडून सोमनाथ कोमरपंत, मध्य प्रदेशकडून भारत सासणे, बडोदे आणि तेलंगणातून डॉ. अरुणा ढेरे आणि कर्नाटकातून डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे महामंडळाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विद्यमान संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी डॉ. प्रेमानंद गज्वी यांचे नाव पाठवले आहे. या नावांबाबत चर्चा होऊन बहुमताचे एका नावाची निवड २८ आॅक्टोबरच्या बैठकीत सन्मानाने केली जाणार आहे.
.......................
मराठवाडा साहित्य परिषदेकडून नरेंद्र चपळगावकर, ना.धों.महानोर आणि प्रेमानंद गज्वी यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र नरेंद्र चपळगावकर आणि ना.धों.महानोर यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने परिषदेला नावे मागे घ्यावी लागली. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेच्या नावांचा बैठकीत विचार केला जाणार नाही.
-------------
२०१० साली ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे झाले होते. उत्तम कांबळे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले होते. त्यावेळी प्रभा गणोरकर निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. डॉ. अरुणा ढेरे यांनी आजवर निवडणूक लढवलेली नाही.