पाचगणीत आणखी एका मुलीला मारहाण
By admin | Published: August 13, 2015 12:28 AM2015-08-13T00:28:28+5:302015-08-13T00:28:28+5:30
शिक्षण क्षेत्रात खळबळ : ‘आराध्य’च्या मालकास होस्टेल मारहाणप्रकरणी अटक
भिलार : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील एका होस्टेल मालकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता एका शाळेविरुद्ध मुलीला मारहाण केल्याची तक्रार दाखल झाल्याने पाचगणीच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुलाला मारहाण केल्याप्रकरणी आराध्य इंटरनॅशनल होस्टेलचा मालक मल्हारी जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.
सेंट झेव्हिअर्स हायस्कूलमध्ये चौथीतील मुलीला मारहाण केल्याची तक्रार पाचगणीचे माजी नगरसेवक हेन्री जोसेफ यांनी दाखल केली आहे. पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, हेन्री जोसेफ (वय ५६) यांची नात जेनिस फर्नांडिस ही सेंट झेव्हिअर्स हायस्कूलमध्ये चौथीत शिकते. ती नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली; परंतु दहा वाजून दहा मिनिटांनी ती रडत घरी आली. घरी येण्याचे कारण विचारले असता, चाचणी परीक्षेत व्यवस्थित लिहिले नाही म्हणून शाळेतील कामिनी मिस यांनी हाताच्या अंगठ्याच्या मागील बाजूवर पट्टीने मारहाण केल्याचे तिने सांगितले. उपचार घेण्यास दवाखान्यात जाण्यासाठी ती घरी आली होती.
याबाबत विचारणा करण्यासाठी हेन्री जोसेफ शाळेत गेले. परंतु, काहीही कारण न सांगता ‘तुमच्या नातीला शाळेतून काढून घेऊन जा. येथे ठेवू नका,’ अशी दमदाटी प्राचार्या सिस्टर शामीन यांनी केली. त्यामुळे जोसेफ यांनी प्राचार्या शामीन आणि कामिनी मिस यांच्याविरोधात पाचगणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)
मान्यता रद्द करा
जोसेफ यांनी शाळेविरोधात शिक्षणमंत्री व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘अशा अनेक घटना या शाळेत घडल्या असून, मुलाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने पालक तक्रार करण्यास धजावत नाहीत. दरवर्षी दहावी-बारावीच्या मुलांना परीक्षेच्या दोन महिने आधी शाळेतून हाकलणे, पालकांना बोलावून ‘मुलाला शाळेतून घेऊन जा; अन्यथा परीक्षेला बसू देणार नाही,’ अशी धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार घडतात. विविध राज्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे अत्याचार सहन करावे लागत आहेत. वर्ष वाया जाऊ नये म्हणून पालक सहन करतात,’ असे निवेदनात नमूद केले आहे. दोन वर्षांत पिळवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची नावेही त्यांनी दिली आहेत.