‘फिफ्टी-‘फिफ्टी’ नामंजूर

By Admin | Published: August 5, 2014 01:00 AM2014-08-05T01:00:50+5:302014-08-05T01:00:50+5:30

जागावाटपाबाबत मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. तीत राष्ट्रवादीने १४४ जागांची मागणी केली. मात्र, काँग्रेसला ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला मंजूर नाही. राष्ट्रवादीला

'Fifty-Fifty' is disapproved | ‘फिफ्टी-‘फिफ्टी’ नामंजूर

‘फिफ्टी-‘फिफ्टी’ नामंजूर

googlenewsNext

काँग्रेस मेळाव्यात राष्ट्रवादीवर रोष : आघाडी करूच नका
नागपूर : जागावाटपाबाबत मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. तीत राष्ट्रवादीने १४४ जागांची मागणी केली. मात्र, काँग्रेसला ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला मंजूर नाही. राष्ट्रवादीला जुन्याच जागा मिळतील, एकही जागा वाढवून मिळणार नाही, विदर्भातील एकही जास्तीचा मतदारसंघ सोडणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या विदर्भ विभागीय मेळाव्यात नेत्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करू नका, अशी मागणी लावून धरली. विशेष म्हणजे उपस्थित कार्यकर्त्यांनीही टाळ्यांचा पाऊस पाडत नेत्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. राष्ट्रवादी काँग्रेसशी कुठल्याही परिस्थितीत आघाडी करू नका, अशी आग्रही भूमिका सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी मांडली. ज्या जागांवर काँग्रेसचे आमदार नाहीत त्या जागांवर आताच उमेदवार जाहीर करा, अशी मागणी मोघे यांनी केली. राऊत म्हणाले, आम्हाला खंजीर खुपसणारे नकोत. आघाडी करायची असेल तर आधी राष्ट्रवादीने विदर्भातील पाच जिल्हा परिषदांमध्ये भाजपशी केलेली युती तोडावी. काँग्रेसमध्ये एकटे लढण्याची ताकद आहे. नेत्यांनी हे हायकमांडला पटवून द्यावे. विदर्भातील सर्व जागा काँग्रेसने स्वतंत्रपणे लढाव्या, अशी मागणी त्यांनी केली. माजी मंत्री मुकुल वासनिक यांनीही या विषयाला हात घातला. ते म्हणाले, वाटाघाटीच्या चर्चा सार्वजनिक होऊ नये. मित्रांना अर्ध्यावर सोडणारी, दगा देणारी काँग्रेस नाही. मात्र, उद्या मित्राकडून दगा होणार असेल तर आपल्यालाही सर्व जागांवर तयारी ठेवावी लागेल, असे सांगत वासनिक यांनीही राष्ट्रवादीपुढे नमते न घेण्याची सूचना केली. शेवटी प्रदेशाध्यक्ष माणिकराव यांनी राष्ट्रवादीशी सुरू असलेल्या चर्चेला वाचा फोडली. ते म्हणाले, राष्ट्रवादी १४४ वर अडली आहे. राष्ट्रवादीचा पवित्रा बरोबर दिसत नाही. वेळेवर घात होऊ नये म्हणूनच आपण सर्वच २८८ जागांवर तयारीला लागण्याच्या सूचना देऊन इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. १६ ते १७ आॅगस्टपर्यंत उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसला धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षांशी आघाडी करण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव येताच त्यावर विचार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खचाखच गर्दी, देवगडे यांना घेरी
विदर्भस्तरीय मेळावा होता. पावसामुळे देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यामुळे सभागृह खचाखच भरले. शेकडो कार्यकर्त्यांना बाहेरच रहावे लागले. बरेच कार्यकर्ते सभागृहात खाली बसले. शेवटी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागपुरातील कार्यकर्त्यांनी खुर्च्या सोडल्या व बाहेरून आलेल्यांना जागा उपलब्ध करून दिली. जागेवरूनही बराच गोंधळ झाला. मेळावा तब्बल सहा तास चालला. मंचावर बसलेला माजी आ. यादवराव देवगडे यांना शेवटी घेरी आली. त्यांना तत्काळ उचलून शेजारच्या कक्षात नेण्यात आले. पाणी देण्यात आले. प्रारंभी आनंदराव तिरपुडे यांचे पाकीट मारले. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांमध्ये रोष महिलेला बाहेर काढले
राज्यात सत्ता असतानाही राज्य सरकारने काँग्रेस कार्यकर्त्यांना काहीच दिले नाही, याची कार्यकर्त्यामध्ये असलेली नाराजी मेळाव्यात स्पष्टपणे जाणवत होती. नेते कार्यकर्त्यांना विचारात नाही, मंत्री प्रश्न सोडवत नाही, त्यांना पदे दिली जात नाही, असे नेत्यांनी भाषणातून सांगताच कार्यकर्ते जागेवर उठून टाळ्या मारत होते. शिट्या मारून प्रतिसाद देत होते. लक्ष्मणराव तायडे यांनी मोदी फसवणूक करीत असल्याचे सांगताच एक कार्यकर्ता उठला. मोदींचे नाव घेऊ नका, तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात ते आधी सांगा, असे त्याने नेत्यांना ठणकावून सांगितले. सभागृह खचाखच भरले होते. समोर खाली बसलेल्या मंजूषा दडवे या महिला कार्यकर्त्या जोरजोरात बोलून नाराजी व्यक्त करीत होत्या. रोहयो मंत्री नितीन राऊत त्यांना समजविण्यासाठी खाली गेले. मात्र, त्यानंतरही त्या शांत बसल्या नाही. आ. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात संबंधित महिला भाजपच्या इशाऱ्यावर गोंधळ घालत असल्याचा मुद्दा समोर करीत त्यांना बाहेर काढण्याची सूचना केली. शेवटी कार्यकर्त्यांनी त्या महिलेला बाहेर काढले. या वेळी एकच गोंधळ उडाला.
जनमंचने वाटली विदर्भाच्या मागणीची पत्रके
मेळाव्यात जनमंचतर्फे वेगळ्या विदर्भाच्या मागणीची पत्रके वाटण्यात आली. भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. आता काँग्रेसने पुढाकार घेऊन हा मुद्दा लावून धरावा. भाजपवर दबाव निर्माण करावा, अशी मागणी या पत्रकांमधून करण्यात आली. जनमंच ९ आॅगस्ट रोजी ‘बस देखो, रेल देखो’ आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधेल. विदर्भ बंधन तयार केले आहेत. ते विदर्भात ३ लाख प्रवाशांना बांधले जातील. या चळवळीला काँग्रेसनेही पाठबळ द्यावे, अशी मागणी पत्रकातून करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही हे पत्रक देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आवर्जून ते वाचलेही.

Web Title: 'Fifty-Fifty' is disapproved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.