भ्रष्टाचाराविरोधातील लढा पडला महागात
By admin | Published: April 4, 2015 04:33 AM2015-04-04T04:33:50+5:302015-04-04T04:33:50+5:30
पेण तालुक्यातील वडखळजवळील निगडे ग्रामस्थ मंडळाची कोणतीही शासकीय नोंदणी नाही. असे असतानाही ग्रामस्थांकडून धार्मिक व इतर सामाजिक कामांच्या
जयंत धुळप, अलिबाग
पेण तालुक्यातील वडखळजवळील निगडे ग्रामस्थ मंडळाची कोणतीही शासकीय नोंदणी नाही. असे असतानाही ग्रामस्थांकडून धार्मिक व इतर सामाजिक कामांच्या नावाखाली लाखो रुपयांच्या देणग्या वसूल करून त्याचा अपहार करून शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक झाल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या गावातील जनार्दन शिवराम नाईक यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गेल्या आठ वर्षांपासून वाळीत टाकल्याप्रकरणी वडखळ पोलिसांनी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या १८ जणांमध्ये निगडे ग्रामस्थ मंडळ प्रमुख पोलीस पाटील नंदकुमार माया म्हात्रे यांच्यासह चंद्रकांत अंबाजी नाईक, हरिश्चंद्र माया म्हात्रे, हिरामण नारायण नाईक, हरिश्चंद्र नारायण नाईक, यशवंत रामा म्हात्रे, परशुराम पोशा नाईक, सखाराम गोविंद मोकल, विश्वनाथ गोविंद्र म्हात्रे, मोहन कृष्णा मोकल, तुकाराम नारायण नाईक, पांडुरंग महादेव नाईक, नामदेव महादेव नाईक, रघुनाथ खंडू नाईक, लक्ष्मण अंबू नाईक, हेमंत गोविंद म्हात्रे, कृष्णा अंबाजी नाईक, गणेश हरिश्चंद्र नाईक यांचा समावेश आहे.
निगडे ग्रामस्थ मंडळ प्रमुख असणारे पोलीस पाटील नंदकुमार माया म्हात्रे व त्यांचे १७ ग्रामस्थ सहकारी हे दरवर्षी धार्मिक व इतर सामाजिक कार्याच्या नावाने लाखो रुपयांच्या देणग्या वसूल करतात. त्यांची कोणतीही नोंद न ठेवता ग्रामस्थांची फसवणूक करतात. याविरोधात आवाज उठवला म्हणून गेल्या आठ वर्षांपूर्वीपासून वाळीत टाकल्याची तक्रार जनार्दन शिवराम नाईक यांनी वडखळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. वाळीत टाकल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमांत सहभागी करून घेण्यास मज्जाव केला.