लढत निकराची, गरज तिसऱ्याची!

By admin | Published: February 20, 2017 01:34 AM2017-02-20T01:34:21+5:302017-02-20T01:34:21+5:30

नाशिक महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेना व भाजपा या दोन पक्षांत निकराची झुंज होताना दिसत आहे. या दोघांच्या

Fight against need, third of the need! | लढत निकराची, गरज तिसऱ्याची!

लढत निकराची, गरज तिसऱ्याची!

Next

किरण अग्रवाल / नाशिक
नाशिक महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेना व भाजपा या दोन पक्षांत निकराची झुंज होताना दिसत आहे. या दोघांच्या अटीतटीत विद्यमान सत्ताधारी ‘मनसे’सह अन्य सारेच पक्ष झाकोळून गेले असले तरी, राज ठाकरे यांच्या एकमात्र सभेने ‘मनसे’च्या अपेक्षा काहीशा उंचावून गेल्या आहेत. अर्थात पक्षीय उमेदवारांखेरीज व्यक्तिगत प्रभावातून म्हणा अगर बाहुबलींच्या मतविभागणीतून, जे अपक्ष उमेदवार मैदान मारण्यात यशस्वी होतील; तेच सत्ता स्थापणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरलेत तर आश्चर्य वाटून घेता येऊ नये.
शिवसेना व भाजपाने एकमेकांवर प्रच्छन्न टीका केली असली तरी या दोघांकडून आयात उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आल्याने स्वकीयांची नाराजी उफाळून आल्याचे दिसले. शिवाय समाज माध्यमात ‘व्हायरल’ झालेल्या कथित अर्थकारणाशी संबंधित व्हिडीओ क्लिप्समुळे भाजपा व गुंडपुंडाना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपासह शिवसेना या दोन्ही पक्षांना टीकेसही सामोरे जावे लागले. असे असताना या दोन्ही पक्षातच मुख्य लढत होताना दिसते, कारण सत्ताधारी ‘मनसे’सह काँग्रेस व राष्ट्रवादीसारख्या पक्षांनाही सक्षम पर्याय म्हणून आपली प्रतिमा निर्माण करता आली नाही.
महापालिकेच्या २०१२मधील निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांच्यासमोर छगन भुजबळ यांचे तगडे आव्हान होते, यंदा भुजबळ कारागृहात असल्याने ‘राष्ट्रवादी’चे अवसान गळाल्यासारखी स्थिती होती. त्यामुळेच राष्ट्रवादीने ‘बॅकफुट’वर जात त्यांच्यापेक्षाही अल्पजीवी असलेल्या काँग्रेसशी ‘आघाडी’ केली. काँग्रेसच्या शहराध्यक्षांवरही भाजपा-सेनेच्या शहराध्यक्षांप्रमाणे उमेदवारी वाटपावरून अर्थकारणाचा व अन्य पक्षीयांशी हातमिळवणी केल्याचा आरोप झाला आहे. पक्षातील अन्यही कोणी त्यांना साथ देईनासे चित्र आहे. यातही दुष्काळात तेरावा महिना म्हणायचा तो असा की, या पक्षांचे वरिष्ठ नेते आपापल्या ठिकाणच्या निवडणुकांत व्यस्त होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेससाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अशा मोजक्या मान्यवरांचे अपवाद वगळता जाहीर सभांनी वातावरण वा स्थिती बदलवू शकणारे नेते प्रचाराला लाभू शकले नाहीत.
राहता राहिला विषय ‘मनसे’चा, तर विद्यमान अवस्थेत महापालिकेत सत्ताधारी असतानाही ३० नगरसेवक सोडून गेल्याने हा पक्ष कालपर्यंत तसा हबकलेल्या अवस्थेतच होता. स्थानिक धुरिणांना सत्तेच्या अनुषंगाने शहरात प्रभाव निर्माण करता न आल्याची बाब अडचणीची होती. अखेर खुद्द राज ठाकरे यांनी त्यासाठी उद्योगपतींशी असलेले आपले वैयक्तिक संबंध उपयोगात आणून नवनिर्माणाच्या काही खुणा उमटविल्या.
त्याच बळावर खिंड लढविली जात आहे. शिवाय शिवसेना-भाजपाच्या प्रचाराचा उधळलेला वारू लक्षात घेता, या दोन्ही पक्षांनी तब्बल ८८ गुंडांना उमेदवारी दिल्याचे सांगत व गुंडांच्या हाती सत्ता सोपविणार का, असा प्रश्न करीत राज यांनी यंदाच्या आपल्या एकमात्र सभेद्वारे निवडणुकीच्या रणांगणातील ‘मनसे’चे आव्हान अगदीच संपले नसल्याचे दर्शवून दिले.

Web Title: Fight against need, third of the need!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.