विखे-थोरातांसह राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई
By Admin | Published: February 13, 2017 12:40 AM2017-02-13T00:40:32+5:302017-02-13T00:40:32+5:30
सातत्याने दोन्ही काँग्रेसने सत्ता मिळविलेल्या नगर जिल्हा परिषदेत या वेळी कोणीही स्वबळावर सत्ता मिळवेल, अशी स्थिती नाही. त्रिशंकू अवस्था
सुधीर लंके / अहमदनगर
सातत्याने दोन्ही काँग्रेसने सत्ता मिळविलेल्या नगर जिल्हा परिषदेत या वेळी कोणीही स्वबळावर सत्ता मिळवेल, अशी स्थिती नाही. त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची लक्षणे आहेत. जिल्ह्यात विखे-थोरातांसह राष्ट्रवादीचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसच येथे काँग्रेसची विरोधक बनली आहे. विखे-थोरात हे मातब्बर नेते जिल्हा सोडून राज्यात फिरत नाहीत, हा आहेर या दोन्ही नेत्यांनीच एकमेकांना जाहीरपणे दिलाय.
जिल्हा परिषदेत गतवेळी ३२ जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर होती. त्या खालोखाल काँग्रेसचे २८ तर सेना-भाजपाचे प्रत्येकी ६ सदस्य होते. या वेळी राष्ट्रवादीचे संख्याबळ २०च्या पुढे सरकेल असे दिसत नाही. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे नेवासा तालुक्यातील गडाख कुटुंब, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यामुळे या तालुक्यात राष्ट्रवादीचे सरळसरळ नुकसान दिसते. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या अकोले, श्रीगोंदा व जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या शेवगाव तालुक्यातही राष्ट्रवादीला निर्विवाद यश मिळेल, अशी परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची या निवडणुकीत मोठी घसरण संभवते. अजित पवार, दिलीप वळसे, धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. मात्र, या पक्षाचे नेते मधुकर पिचड व जिल्हाध्यक्ष आपापल्या तालुक्यांतच अडकून पडलेत.
काँग्रेसही गतवेळचा आकडा गाठेल, अशा स्थितीत नाही. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर व राधाकृष्ण विखे यांचा राहाता तालुका वगळल्यास, इतर तालुक्यात काँग्रेसला निर्विवाद यश मिळणार नाही. विखे-थोरात यांचे भांडण या वेळी टोकाला गेलेय. विखे यांच्या मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद गट हे थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात येतात. या गटात विखे यांच्या समर्थकांना काँग्रेसची उमेदवारी आहे. हे करताना आपणाला जराही विश्वासात घेतले नाही, ही थोरात यांची खंत आहे. त्यांनीही या दोन गटात स्वतंत्र उमेदवार दिले. विखे-थोरात हे दोघेही आता उघडपणे एकमेकांच्या विरोधात भाषणे करत आहेत. विखे राज्य सोडून नगर जिल्ह्यातच कनोली, मनोलीसारख्या गावांत फिरत बसलेत, असा जाहीर आरोप थोरात यांनी केला. तर थोरात हेही स्वत:चा मतदारसंघ सोडून पक्षकार्य करत नाहीत, असे विखे म्हणाले. थोरात यांनी एक प्रकारे विखेंच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतच दंड थोपटले आहे. हा वाद भविष्यात राज्यपातळीवर संघटनात्मक बदलांपर्यंत पोहोचेल की काय? अशी शंका आहे.
विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या लोणी गटातून जिल्हा परिषद रिंगणात आहेत. त्यांना अध्यक्ष करून पुत्र सुजय विखे यांच्यासाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची बांधणी करायची, हा विखेंचा पुढील अजेंडा दिसतो. त्यामुळेच त्यांनी दक्षिण जिल्ह्यात निवडणुकीवर प्रचंड लक्ष केंद्रित केले आहे. या भागातील सर्व प्रचार यंत्रणा व तिकीटवाटपही सुजय विखे यांनी हातात घेतले असून, ते हेलिकॉप्टरने प्रचार करत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, बाळासाहेब थोरात यांपैकी कुणीही या भागात प्रचारात दिसत नाही. प्रदेशचे नेतेही अद्याप जिल्ह्यात आलेले नाहीत. त्यामुळे दक्षिण जिल्ह्यातील आठ तालुक्यांत जे यशापयश पदरात पडेल त्याची जबाबदारी विखेंवर येणार आहे.
भाजपाने ‘मिशन फोर्टी’चा नारा देऊन प्रचारात सर्वांपेक्षा आघाडी घेतलेली आहे. एकमेव भाजपाने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. पालकमंत्री राम शिंदे प्रथमच विखे-थोरात व घराणेशाहीबाबत आक्रमकपणे बोलत आहेत. मात्र, भाजपाचे प्रदेशचे मोठे नेते जिल्ह्यात आलेले नाहीत. भाजपा या वेळी दोन आकडी संख्या गाठून पुढे सरकेल, पण २० जागांच्या पुढे जाताना त्यांचीही दमछाक होईल. शिवसेना याही निवडणुकीत फार कमाल दाखवेल, असे वाटत नाही. सेनेलाही वरिष्ठ नेते प्रचारासाठी अजून मिळालेले नाहीत. निवडणुकीत कुणालाही स्वबळ न मिळाल्यास जिल्ह्यात काहीही समीकरणे आकाराला येतील, असे आरोप प्रत्यारोपांतून दिसते.