लढा दारूमुक्त खारघरसाठी...
By admin | Published: February 26, 2017 02:02 AM2017-02-26T02:02:43+5:302017-02-26T02:02:43+5:30
दारूमुक्त खारघरसाठी मागील एक दशकापेक्षा जास्त काळ लढा सुरू आहे. सिडकोच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या नियोजनबद्ध अशा खारघर नोडला दारूमुक्त करण्याचा
- वैभव गायकर
दारूमुक्त खारघरसाठी मागील एक दशकापेक्षा जास्त काळ लढा सुरू आहे. सिडकोच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या नियोजनबद्ध अशा खारघर नोडला दारूमुक्त करण्याचा उद्देश उराशी बाळगून संघर्ष या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. या लढ्याला खऱ्या अर्थाने २००२ सालापासून सुरुवात झाली. कोपरा गावात अजित पॅलेस बारच्या विरोधात सुरू झालेल्या या लढ्याचे रूपांतर मोठ्या लढ्यात झाले. कालांतराने वसाहतीमधील नागरिकांनी पाठिंबा देत २००७ साली संघर्ष समितीची स्थापना केली. त्यानंतर दारूमुक्तीचा लढा तीव्र झाला. त्याला २०१७मध्ये १० वर्षे पूर्ण होत आहेत.
खारघरमधील कोपरा गावातून सुरू झालेला हा लढा शहरभर पसरला. यात खारघर ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा वाटा असून, ग्रामपंचायतीने खारघरला दारूमुक्त करण्याचा ठराव करून राज्य शासनाकडे पाठविला होता. येथे काही हॉटेल्सना राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी विशेष अधिकार वापरून दारूविक्रीचा परवाना बहाल केल्यानंतर प्रचंड असंतोष निर्माण झाला. रायगड जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय शासकीय समितीने याला विरोध दर्शवला होता. हाच विषय राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांनी यासंबंधी विषय राखून ठेवला आहे. सर्वोच्च्च न्यायालयाच्या आदेशानुसार खारघर शहरातील दोन दारूची विक्री करणारी हॉटेल्स १ एप्रिलपासून बंद होणार आहेत. त्यामुळे एका अर्थाने संघर्षच्या लढ्याला यश येणार आहे.
खारघर शहराला दारूमुक्त करण्यासाठी आम्ही शपथ घेतली आहे. येणारी पिढी सुदृढ हवी तर शहरवासीयांनी आपले योगदान दिले पाहिजे. मंत्र्यांनी राखून ठेवलेल्या निर्णयावर या वर्षात सकारात्मक निर्णय येईल अशी आशा आहे. तसेच १ एप्रिलनंतर महामार्गालगतची दारू विक्रीची दुकाने बंद होणार असल्याने आमच्या लढ्याला यश येणारच आहे.
- संजय जाधव, अध्यक्ष,
संघर्ष समिती खारघर