परभणीतील फरकंड्यात ग्रामपंचायत वादातून हाणामारी, ६० जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 04:28 AM2021-01-20T04:28:24+5:302021-01-20T04:30:54+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार भांडणात झाले.
पालम (जि. परभणी) : तालुक्यातील फरकंडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्याद देण्यास गावातील कोणीही पुढे न आल्याने सरकारी फिर्यादीवरून दोन गटांतील ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार भांडणात झाले. ऐनवेळी वीज गेल्याने लाठ्याकाठ्यानी एकमेकांशी तुंबळ हाणामारी सुरू करण्यात आली. यात दोन्ही गटांतील ८ जण जखमी झाले असून, पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलीस गावात बंदोबस्तासाठी दाखल झाले. परिस्थिती आटोक्यात आली असून, गावातून कोणीही फिर्याद दिली नाही. त्यामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष बाबुराव आगळे यांच्या फिर्यादीवरून विजयी गटातील ४५, तर पराभूत गटातील २० अशा
६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात कबीरवाडी, हिरानगरमध्ये राडा -
- नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतरही अनेक गावांमध्ये राडेबाजी सुरूच आहे. मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कबीरवाडी आणि मुक्रमाबाद हद्दीत हिरानगर तांडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून मारहाणीच्या घटना घडल्या. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. अनेकांची यात डोकी फुटली तर दोन्ही गटातील शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले.
- सोमवारी मतमोजणी झाल्यानंतरही काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. मौजे कबीरवाडी येथे बालाजी सोपान सलगरे यांनी तक्रार दिली. ग्रामपंचायत निवडणुकीत मदत का केली नाही म्हणून विराेधी गटाच्या सदस्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणात मरखेल ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तर मुखेड तालुक्यातील हिरानगर तांडा येथे सुनीता विजय राठोड या महिलेला कुणाला मतदान केले असे म्हणून दगडाने मारहाण करण्यात आली तसेच गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.