Maha Vikas Aghadi: शिवसेनेत 'मारामारी', राष्ट्रवादीत 'दादागिरी', काँग्रेसमध्येही 'दरी'; महाविकास आघाडीही फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 10:53 AM2022-07-03T10:53:15+5:302022-07-03T10:57:11+5:30

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

fight in shivsena and ncp unwilling to stay together maha vikas aghadi going to collapse | Maha Vikas Aghadi: शिवसेनेत 'मारामारी', राष्ट्रवादीत 'दादागिरी', काँग्रेसमध्येही 'दरी'; महाविकास आघाडीही फुटणार?

Maha Vikas Aghadi: शिवसेनेत 'मारामारी', राष्ट्रवादीत 'दादागिरी', काँग्रेसमध्येही 'दरी'; महाविकास आघाडीही फुटणार?

googlenewsNext

मुंबई

शिवसेनेत बंडखोरीच्या वादळामुळे पक्ष फुटलेला असताना आता महाविकास आघाडी देखील फुटीच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडीला धक्का दिला आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपा शिंदे गटाच्या सहाय्यानं सत्तेत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्यात भाजपाला यश आलं आहे. यातच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीतील दूरी आणखी वाढल्याचं दिसून येत आहे. कारण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसल आपला उमेदवार द्यायचा होता. पण बैठकीत तडजोड झाली आणि शिवसेनेचा उमेदवार देण्याचं ठरविण्यात आलं. 

विधानसभा अध्यक्ष निवडणूक LIVE UPDATES येथे क्लिक करा

भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला होतं. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बैठकीत शिवसेनेचा उमेदवार देण्याचं ठरलं आणि यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचं वातावरण आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यंत्री अजित पवार देखील गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्या बंडात भाजपाचा काही हात नाही असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांना राज्याबाहेरील घडामोडींची माहिती नसते असं विधान करत घरचा आहेस दिला होता. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. यातच शिवसेना पक्षाला फुटीचं ग्रहण लागलेलं असताना शरद पवार यांनीही महाविकास आघाडी वाचविण्यासाठी फारसा रस दाखवला नाही अशाही बातम्या समोर आल्या होत्या. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ!

राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांना निधी उपलब्ध करुन दिला जात नाही अशी ओरड शिवसेना आमदारांची होती. याबाबतही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. राष्ट्रवादीने शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील कॅमेऱ्यासमोर येऊन १० मिनिटांचा बाईट दिला. यात त्यांनी कोणत्या विभागाला किती निधी दिला याची आकडेवारीच मांडली आणि शिवसेना आमदारांचे आरोप फेटाळून लावले होते. हेच स्पष्टीकरण राष्ट्रवादीला याआधीही देता आलं असतं पण शिवसेना फुटल्यानंतरच जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. म्हणजेच शिवसेना आमदारांच्या आरोपांची खदखद राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही होती हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अजित पवारांबाबत निधी वाटपाच्या तक्रारी असल्याचं विधान करत धक्का दिला होता. नाना पटोलेंच्या विधानामुळे अजित पवार यांचा चांगलाच संताप झाला होता. तसंच शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर काँग्रेसमधील काही आमदार देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यामुळे तातडीची पावलं उचलत केंद्रानं कमलनाथ यांना राज्यात पाठवण्यात आलं होतं. पण तेही दोन दिवसांत आमदारांशी चर्चा करून माघारी परतले होते. काँग्रेसचे आमदार भाजपाच्या गोटात जाऊ नयेत यासाठी काँग्रेसकडून काळजी घेण्यात आली होती. 

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे आणि भाजपा सत्तेत आल्यामुळे महाविकास आघाडीची मोट कमकुवत करण्यास भाजपासाठी अधिक सोपं ठरू शकेल. सत्तेतून बाहेर फेकले गेलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता भाजपाच्या टार्गेटवर असेल जणेकरुन महाविकास आघाडीला सुरुंग लावता येईल. यातच विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

Web Title: fight in shivsena and ncp unwilling to stay together maha vikas aghadi going to collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.