गाईच्या बचावासाठी बिबट्याशी झुंज
By admin | Published: September 11, 2015 03:04 AM2015-09-11T03:04:24+5:302015-09-11T03:04:24+5:30
गावातील शेतकऱ्यांचे पशुधन घेऊन जंगलात जायचे... दिवसभर रानात भटकंती करायची अन् सायंकाळी जनावरांना घेऊन गावात परत यायचे. असा गुराख्यांचा नित्यक्रम.
- नितीन मुसळे , सास्ती (चंद्रपूर)
गावातील शेतकऱ्यांचे पशुधन घेऊन जंगलात जायचे... दिवसभर रानात भटकंती करायची अन् सायंकाळी जनावरांना घेऊन गावात परत यायचे. असा गुराख्यांचा नित्यक्रम. मात्र बुधवारी एका गुराख्याला जीवघेण्या संकटाचा सामना करावा लागला. चुनाळा येथील जंगलात एका बिबट्याने कळपातील गाईवर
हल्ला केला आणि गुराख्याने प्रसंगावधान दाखवत चक्क त्या बिबट्याशी झुंज दिली. गुराख्याच्या तीव्र प्रतिकारामुळे बिबट तेथून पळून गेला. सुदैवाने गाय आणि गुराखी दोघेही बचावले.
चुनाळा येथील ५५ वर्षीय यादव मारोटी टेकाम हा बुधवारी दुपारी ३.३०च्या सुमारास जंगलात गाई चारत असताना समोरुन अचानक एक बिबट आला. त्याने एका गाईवर हल्ला चढविला.
मात्र यादवने न घाबरता त्या बिबट्याशी झुंज देत नाना युक्त्या करून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. शेवटी आरडाओरड करून त्या बिबट्याला तेथून पळवून लावले. बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी झाली असली तरी तिचा जीव वाचला.
जंगली जनावरांचा वावर लगतच्या परिसरात वाढला असून त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे वन विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
बिबट्याने आपली भूक भागविण्यासाठी गाईवर हल्ला करून तिला शिकार बनविण्याचा प्रयत्न केला. मी आपल्या जनावरांच्या रक्षणासाठी त्याला तिथून पळवून लावले. त्याने त्याचे काम केले मी माझे काम केले, असे टेकाम याने सांगितले.