बीएसएनएलच्या कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरुपी करण्यासाठी लढा : नम्बुदरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 08:02 PM2017-12-03T20:02:00+5:302017-12-03T20:07:23+5:30
नाशिक : एकेकाळी देशातील सर्वात मोठी अशी दूरसंचार कंपनी अशी बिरुदावली मिरविणा-या भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी एक लाख तर कंत्राटी कर्मचा-यांची संख्या एक लाख ३० हजार आहे़ कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरुपी करून किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता, यासह विविध सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आगामी काळात युनियन तीव्र लढा देणार असल्याचे प्रतिपादन आॅल इंडिया बीएसएनएल कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष व्ही,ए.एन.नम्बुदरी यांनी रविवारी (दि़३) केले़
कॅनडा कॉर्नरवरील दूरसंचार कार्यालयात बीएसएनएल एम्पलॉईज युनियन व बीएसएनएल क्रॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनच्या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या युनियनच्या उद्घाटनाप्रसंगी नम्बुदरी बोलत होते़ पुढे बोलताना म्हणाले की, कामगार चळवळीला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले असून शासन मूठभर लोकांसाठी कामगारांची पिळवणूक करीत आहे़ बीएसएनएल कंपनीचे खासगीकरण होऊ नये, कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी, कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी कंत्राटी कामगारांनी संघटना स्थापन करावी, बीएसएनएल युनियन या संघटनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहील असे आश्वासन नम्बुदरी यांनी यावेळी दिले़
आॅल इंडिया कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे सचिव अनिमेश मित्रा यांनी शासन कामगारांवर कसा अन्याय करते याबाबत माहिती दिली़ किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता या सुविधा कंत्राटी कर्मचा-यांनाही मिळाव्यात यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला़ यावेळी व्यासपीठावर बीएसएनएलचे आॅल इंडीया असिस्टंट जनरल से्रकेटरी जॉन वर्गिस, सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ़डी़एलक़राड, महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष आप्पासाहेब गाजरे, सीताराम ठोंबरे उपस्थित होते़ महाराष्ट्र सर्कलचे सचिव नागेश नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले़ राजेंद्र लहाने यांनी प्रास्ताविक केले़
या परिषदेला आॅल इंडिया कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्यासह युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ दरम्यान, परिषदेत सोमवारी (दि़४) होणा-या बीएसएनएल एम्पलॉईज युनियनमध्ये कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची मागणी केली जाणार असून यासाठी महाराष्ट्रातील युनियनचे जिल्हा सचिव उपस्थित राहणार आहेत़