स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील लेखांवरून कॉँग्रेस-भाजपमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 05:00 AM2020-02-14T05:00:15+5:302020-02-14T05:01:30+5:30
‘शिदोरी’तील मांडणीवर काँग्रेस ठाम : मासिक मागे घेण्याची फडणवीस यांची मागणी
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्र मासिकातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविषयीच्या दोन लेखांवरून काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. संबंधित लेख अत्यंत आक्षेपार्ह असून राज्य शासनाने बंदी आणावी आणि काँग्रेसने तत्काळ हे मासिक मागे घ्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे. तर ‘शिदोरी’तील मांडणीवर ठाम असून अंक मागे घेणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
अतिशय गलिच्छ आणि विकृत स्वरूपाचे लिखाण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत या दोन्ही लेखांमधून करण्यात आले आहे. शिवसेनेला अभ्यासाचे आणि अभ्यासावर आधारित वस्तुनिष्ठ माहितीचे वावडे असल्याचेही ‘शिदोरी’मध्ये म्हटले आहे. हे शिवसेनेला चालते का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्य सरकारने कारवाई केली नाही तर भाजप आणि राष्ट्रीय हिताला जपणारे लोक याविरोधात तीव्र पाऊले उचलतील. मध्य प्रदेशात शिवरायांचा अपमान, राजस्थानमध्ये वीर सावरकरांचे छायाचित्र काढण्याचा फतवा असे एकापाठोपाठ एक प्रकार होत असताना त्याच काँग्रेस पक्षाला मित्रपक्ष
म्हणून स्वीकारणाऱ्या शिवसेनेला याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यावेच लागेल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाºया मध्यप्रदेश सरकारने तत्काळ माफी मागून ज्याठिकाणी पुतळा होता, त्याच ठिकाणी तो पुनर्स्थापित करावा. महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना अतिशय तीव्र आहेत, याची सरकारने दखल घ्यावी, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, फडणवीसांना इतिहास माहिती नसावा. आपल्या राजकीय स्वार्थासाठी सतत सावरकरांचा विषय पेटवण्याचा उद्योग ते करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. राज्यातील
सत्ता गेल्याच्या दु:खातूनच फडणवीस आणि अन्य भाजप नेते बोलत आहेत.
शिदोरी मासिकातील अंकात सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा त्यांचा द्वेष किंवा बदनामी करण्यासाठी नाही. सावरकरांबद्दल काँग्रेसला व्यक्तीद्वेष नाही, त्यांच्या विचारांना विरोध आहे. या लेखात ऐतिहासिक सत्यच मांडलेले आहे, त्यातील एक शब्दही वावगा नाही.
वस्तुनिष्ठ माहितीवर आधारीत हा लेख आहे. लोकांचे प्रबोधन व्हावे हाच त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे अंक मागे घेणार नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
तसेच, मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याची पद्धत चुकीची होती. त्याची दखल काँग्रेस सरकारने घेऊन तत्काळ चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. परंतु यावरही फडणवीसांनी राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न केलेला आहे, असे सावंत म्हणाले.
मध्य प्रदेशातील घाण महाराष्ट्रात येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले होते. आता या ताज्या अंकातील लिखाणावर सत्तारूढ शिवसेना सहमत आहे का आणि सत्तेसाठी आणखी किती लाचारी पत्करणार? काँग्रेसने माफी मागून हे पुस्तक परत घ्यावे किंवा या पुस्तकावर सरकारने बंदी घालावी.
- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री