जात पंचायतीविरोधात तरुणाचा लढा
By admin | Published: January 15, 2016 10:36 PM2016-01-15T22:36:23+5:302016-01-16T00:26:00+5:30
कुटुंबाला टाकले होते वाळीत : पेरलेच्या गोपाळनगरमधील अन्यायग्रस्त कुटुंबालाच दंड
संजय पाटील--कऱ्हाड-पुरोगामी सातारा जिल्ह्यातील एका गावात आजही जात पंचायत भरते. पंचांसमक्ष पक्षकारांचा ‘खटला’ चालतो आणि तासाभरात न्यायनिवाडाही होतो. याचा फटका एका तरुणाला बसला. अन्याय त्याच्या कुटुंबावर झाला आणि पंचांनी त्यांनाच दंड ठोठावला. तसेच त्याच्या वडिलांना माफीही मागायला लावली.
पेरले गावातील गोपाळनगरमध्ये एकवीस वर्षीय विकास चव्हाण हा युवक कुटुंबासह राहतो. विकासला दिनकर व निवास हे दोन भाऊ असून, बहिणींची लग्न झाली आहेत. सध्या तो पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतोय. वर्षभरापासून विकासला जात पंचायतीच्या अजब निवाड्याचा सामना करावा लागतोय. अन्याय सहन करायचा आणि परत काही कारण नसताना माफी मागून दंडही भरायचा, अशी वेळ या कुटुंबावर आली आहे.
विकासने दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी मार्च महिन्यात विकासच्या बहिणीचा तिच्या पतीशी वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी विकासचे वडील मुलीच्या गावी गेले; मात्र तेथे जावयाने विकासच्या वडिलांनाच मारहाण केली. हा वाद जात पंचायतीत मिटविण्याचे ठरले. त्यानुसार पेरले गावातच गोपाळनगरमध्ये पंचायत भरली. या पंचायतीला विकासचे कुटुंबीय व त्यांच्या जावयाचे कुटुंबीय हजर होते. पंचांनी या दोन्ही पक्षकारांकडून माहिती घेतली. तसेच दोघांनाही ४०-४० हजार रुपये दंड सुनावला. हा दंड भरण्यास विकासने नकार दिला. ‘अन्याय आमच्यावर झाला; मग दंड कसला भरायचा?,’ असा प्रतिप्रश्नही त्याने पंचायतीला केला. त्यामुळे वादाची ठिणगी पडली. पंचांसह अनेकांनी विकासला व त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. तसेच या कुटुंबाच्या सुख-दु:खात, अडीअडचणीत, शुभकार्यात कोणीही सहभागी व्हायचे नाही, असे फर्मान सोडण्यात आले. कोणी याचे पालन केले नाही तर त्या कुटुंबालाही वाळीत टाकण्याचा इशारा देण्यात आला.
नोव्हेंबर २०१५ मध्ये पुन्हा या पंचायत भरविली. त्यावेळी विकासने उंब्रज पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. ही पंचायत बेकायदेशीर असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, ही माहिती समाजातील लोकांना देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी काहीजणांनी विकासला रस्त्यावर अडविले. ‘आमच्या परंपरेत आडकाठी आणू नकोस नाही तर तुला दफन करीन,’ अशी धमकी त्याला दिली.
या सर्व प्रकाराबाबत विकासने ‘अंनिस’कडे तक्रार केली. ‘अंनिस’ने गंभीर दखल घेतली असून, हा प्रकार मोडीत काढण्यासाठी पावले उचलली आहेत.
आठ दिवसांत होणार बैठक
‘अंनिस’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोपाळनगरमधील प्रतिष्ठित ग्रामस्थ प्रकाश चव्हाण यांची भेट घेतली असता त्यांनी जात पंचायत भरत असल्याचे मान्य केले. तसेच विकासच्या कुटुंबाला दंड केल्याचेही सांगितले. मात्र, हा दंड विकासने पंचांना केलेल्या शिवीगाळीमुळे झाला, असेही त्यांचे म्हणणे होते. अखेर अशाप्रकारे दंड घेणे हा कायद्याने खंडणीचा गुन्हा असल्याचे ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश चव्हाण यांना सांगितले. तसेच ‘जात पंचायत बरखास्त करा,’ अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत सर्व पंचांची आठवडाभरात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे प्रकाश चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
विकास शिक्षणासाठी सातारला गेला. त्यानंतर पंचांनी त्याच्या वडिलांना बोलावून घेऊन ‘समाजात परत घेण्यासाठी ३ हजार ४०० रुपये दंड भरावा लागेल,’ असे सुनावले. विकासच्या वडिलांनी तेवढी रक्कम भरली व आपल्या कुटुंबाची एकलकोंड्या जीवनातून सुटका करून घेतली.
‘अंनिस’ने घेतली कुटुंबीयांची भेट
विकासने लेखी तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर कणसे, भगवान रणदिवे, आकाश राऊत, शिवाजी शिंदे, संतोष जाधव, रामचंद्र रसाळ यांनी अन्यायग्रस्त चव्हाण कुटुंबीयांची भेट घेतली. विकास व त्याचे वडील दिलीप यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेच या समाजातील प्रतिष्ठित प्रकाश चव्हाण यांनाही पदाधिकारी व कार्यकर्ते भेटले. जात पंचायतीचा प्रकार बंद व्हावा, अन्यथा प्रचलित कायद्यानुसार पोलिसांमार्फत कारवाई करावी लागेल, असेही या पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.
समाजातील कोणतेही प्रकरण जात पंचायतीत मिटवावे, अशी जबरदस्ती आम्ही कधीही केलेली नाही. ज्यांना पोलीस ठाण्यात जायचे आहे, त्यांनाही कधी अडविले नाही. जात पंचायत रद्द व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, याबाबत सर्वजण एकत्र बसूनच निर्णय घेतील. सर्वांशी त्याबाबत चर्चा करू.
- प्रकाश चव्हाण, गोपाळनगर, पेरले
जात पंचायत हा प्रकार पूर्णत: बेकायदेशीर आहे. कोणाला वाळीत टाकणे किंवा कुणाकडून जबरदस्तीने दंड वसूल करणे, हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. पेरलेच्या गोपाळनगरमधील जात पंचायत बरखास्त करण्याबाबत आम्ही समज दिली आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू.
- प्रशांत पोतदार, राज्य सरचिटणीस, अंनिस