कमी किंमतीत कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 03:55 PM2024-02-05T15:55:48+5:302024-02-05T15:56:43+5:30
मागच्या तीन महिन्यांपासून कापूस, सोयाबीन आणि कांदा दराने माना टाकल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हैराण असून अनेक शेतकऱ्यांना साठवेलला माल कसा विकायचा असा प्रश्न पडला आहे.
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कापसाला MSP पेक्षा कमी दर दिला जातोय अशी तक्रार शेतकऱ्यांनी मांडली होती. त्यावर आता राज्य सरकारनं कडक पाऊले उचलण्याचं ठरवलं आहे. कमी किंमतीत कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेशच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. त्यात कमी पैशात कापूस खरेदी करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असून या लोकांवर गुन्हे दाखल करून कापूस खरेदीवर चाप बसवला जाणार आहे. MSP पेक्षा कमी दरात कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत दिले. सरकारचा हा निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा आहे. जर यापुढे कुणी कमी दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असेल तर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत.
मागच्या तीन महिन्यांपासून कापूस, सोयाबीन आणि कांदा दराने माना टाकल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हैराण असून अनेक शेतकऱ्यांना साठवेलला माल कसा विकायचा असा प्रश्न पडला आहे. दर वाढतील या अपेक्षेने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीचा कापूस साठवून ठेवला आहे पण दराने त्यांची निराशा केली. कापसाला ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर केला आहे पण आज एकाही बाजार समितीमध्ये तेवढा दर मिळाला नाही. आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार एच-४-मध्यम स्टेपल, हायब्रीड, लोकल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये देऊळगाव राजा, मनवत आणि सेलू तालुक्यातील सिंदी येथे मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक झाली होती. तर इतर बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक घटलेली दिसून येत आहे.
२ दिवसांपूर्वी मनवत बाजार समितीमध्ये ६ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून किमान दर हा ६ हजार ५०० आणि कमाल दर हा ६ हजार ९३५ रूपये एवढा होता. हा सरासरी दर ३ फेब्रुवारी दिवसातील सर्वांत जास्त दर होता. तर नेर परसोपंत बाजार समितामध्ये दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर ५ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. हा कापसाचा दर या हंगामातील सर्वांत कमी दर असून हा दर हमीभावापेक्षा २ हजार २० रूपयांनी कमी होता.