...तर माझा जीवही गेला असता; विनायक राऊत, नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल करा - भावना गवळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 05:57 PM2022-11-23T17:57:31+5:302022-11-23T17:58:16+5:30
विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का? असा सवाल भावना गवळींनी उपस्थित केला.
मुंबई - अकोला रेल्वे स्टेशनवर अत्यंत घाणेरडे वृत्तीने तिथे माझ्यासोबत वर्तन घडले. त्या लोकांच्या जमावात माझा जीवही गेला असता. त्यामुळे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख या दोघांवर गुन्हे दाखल होऊन अटक झाली पाहिजे. माझी तक्रार मी राज्य महिला आयोग, लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे असं शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींनी म्हटलं आहे.
खासदार भावना गवळी म्हणाल्या की, दरवेळीप्रमाणे अकोल्याहून मी मुंबईला येताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख जवळपास ५०-१०० जणांसह तिथे होते. मी रेल्वेत बसत असताना त्यांनी लोकांना चिथवण्याचे काम केले. त्यांना माझ्या अंगावर पाठवले. अक्षरश: ते माझ्या अंगावर आले. माझा जीव जाईल असं त्यांचे कृत्य होते. नीच वागणूक तिथे झाली. हे सगळं काम विनायक राऊत, नितीन देशमुख यांनी केलेय. त्यामुळे अकोला एसपींकडे मी माझी तक्रार दिली आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का?. यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे. हे राज्य छत्रपतींचे आहे. मी असं राजकारण करू शकत नाही. माझं राजकारण विकासाचं आहे. लोकांना समाधानी आणि योजना लोकांपर्यंत कशा पोहचल्या पाहिजे यासाठी राजकारण आहे असंही भावना गवळींनी सुनावलं.
खरे गद्दार तुम्हीच आहात
आम्ही बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलो. आज त्यांच्यासोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडून ज्यांनी विरोधकांशी युती केली ते खरे गद्दार आहे. तुम्ही चांगले वागले नाहीत म्हणून आम्ही गेलो नाही. काल जी कृती केली ती बोलण्यापलीकडची होती. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आले नाही ते बिहारला गेले. तुम्ही गद्दार आहात. तुम्हाला घर सांभाळता आलं नाही ते आमच्यावर टीका करतायेत. आधी घर सांभाळा अशा शब्दात खासदार भावना गवळींनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"