प्रशांत कोरटकरविरोधात राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करा, नागपूर राजघराण्यातील भोसलेंची मागणी
By योगेश पांडे | Updated: March 23, 2025 19:37 IST2025-03-23T19:36:08+5:302025-03-23T19:37:22+5:30
Nagpur News: इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर फरारच आहे. त्याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे.

प्रशांत कोरटकरविरोधात राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करा, नागपूर राजघराण्यातील भोसलेंची मागणी
- योगेश पांडे
नागपूर - इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर फरारच आहे. त्याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
कोरटकरविरोधात नागपूर, कोल्हापूर व जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिल्यानंतरदेखील कोरटकर समोर आला नव्हता. आता त्याचा जामीन फेटाळल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर येथील पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. मात्र त्याच्या निवासस्थानी तो आढळला नाही. पोलीस पथकाने चंद्रपूर व मध्यप्रदेशमध्येदेखी त्याचा शोध घेतला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. नागपूर सायबर पोलिस ठाण्याचीदेखील मदत घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्याला ‘चिल्लर’ म्हटले तो कोरटकर पोलिसांकडून पकडल्या जात नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. कोरटकरला अटक होत नाही हे गृहविभागाचे अपयश आहे. महाराष्ट्रातील पोलिसांवर यामुळे मोठी नामुष्की ओढविली आहे. कोरटकरला सहकार्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच कोरटकरविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.