'मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा', भाजपा आमदार अतुल भातखळकरांची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:29 PM2021-09-14T15:29:13+5:302021-09-14T15:29:43+5:30

BJP MLA Atul Bhatkhalkar file complaint against Chief Minister Uddhav Thackeray : कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे या मुद्द्यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

'File a case against the Chief Minister', BJP MLA Atul Bhatkhalkar lodged a complaint with the police | 'मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा', भाजपा आमदार अतुल भातखळकरांची पोलिसात तक्रार

'मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा', भाजपा आमदार अतुल भातखळकरांची पोलिसात तक्रार

Next

मुंबई : साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता भाजपाने (BJP) आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे या मुद्द्यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले. तसेच, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला सामना या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असे अतुल भातखळकर म्हणाले.

याचबरोबर, तक्रार दाखल करण्याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांचा निषेध करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता परप्रांतीयांचा हिशोब ठेवणार आहेत. परप्रांतीय कुठून येतात, कुठे जातात याबाबत पोलिस परप्रांतीयांच्या नोंदी ठेवतील असे मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांना असे सांगताना लज्जा वाटायला हवी होती. कारण याच परप्रांतीयांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही 'लाही-चणा' हा कार्यक्रम ठेवता. 'केम छो वरली' म्हणता. काँग्रेसच्या सोबत जाण्यामुळे काय तुम्ही रोहिंग्यो मुसलमानांना विसरून गेलात का? बांगलादेशी मुसलमानांच्या कारनाम्यांना विसरलात का?, असे सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरे यांचे पोलिसांना निर्देश
१) गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.
२) इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.
३) जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.
४) निती आयोगाच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.
५) शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.
६) महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.

राज ठाकरेंची सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडून मान्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात जाहीर व्यासपीठावरुन बोलताना राज्य सरकारला सूचनावजा अवाहन केले होते. या अवाहनात त्यांनी म्हटले होते की, 'राज्यात कुठून परप्रांतीय येतात, कुठे जातात, कुठे राहतात, याची कसलीही नोंद नाही. ती नोंद राहिली पाहिजे, परप्रांतीयांच्या बाबतीची माहिती ही स्थानिक पोलीस स्टेशनकडे पर्यायाने राज्य सरकारकडे असली पाहिजे'. त्यामुळे राज ठाकरे यांची मागणी राज्य सरकारने एकप्रकारे मान्य केली आहे.

Web Title: 'File a case against the Chief Minister', BJP MLA Atul Bhatkhalkar lodged a complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.