KBC 11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानप्रकरणी अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 07:27 PM2019-11-07T19:27:23+5:302019-11-07T19:31:50+5:30
'कौन बनेगा करोडपती...' कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी सोनी वाहिनी, अभिनेता. अमिताभ बच्चन, कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माता यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पुण्यात केली आहे.
पुणे : 'कौन बनेगा करोडपती...' कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी सोनी वाहिनी, अभिनेता. अमिताभ बच्चन, कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माता यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पुण्यात केली आहे. त्याकरिता त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला आहे . दुसरीकडे सोशल मीडियावरही तरुणांनी वाहिनीचा निषेध केला आहे. त्याकरिता अनेकांनी सोशल मीडियावर मोहीमही उभारली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या कार्यक्रमात 'इनमे से कोनसे शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे'...? या प्रश्नावर चार पर्याय देण्यात आले होते. त्यात ए ) महाराणा प्रताप बी ) राणा सांगा सी ) महाराजा रणजीत सिंह डी ) शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. त्यात महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की, ह्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक खोडसाळपणे उत्तरांच्या पर्यायांमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा' उल्लेख 'एकेरी' शब्दात फक्त 'शिवाजी' हा करण्यात आलेला आहे. हे निषेधार्ह आहे. महाराजांची बदनामी म्हणून बच्चन, वाहिनी आणि संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा'.
याच विषयावर सर्वेश देशपांडे या तरुणानेही समाजमाध्यमांवर याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तो लोकमतशी बोलताना म्हणाला की, या पर्यायांमध्ये इतर तीन सम्राटांच्या नावापुढे उपाधी लावण्यात आली आहे. त्यामुळे नजरचुकीने होणारी चूक म्हणता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही अखंड हिंदुस्थानचे दैवत मानतो. त्यामुळे या चुकीची वाहिनीने बिनशर्त माफी मागावी. आणि नुसती लहान पट्टी चालवून नाही तर महाराजांचा आदरपूर्वक उल्लेख करून अमिताभ बच्चन यांनी माफी मागावी. कारण आमच्या रक्तात महाराजांचा डीएनए आहे. असे झाले नाही तर होणाऱ्या उद्रेकास वाहिनी जबाबदार असेल.