पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल
By Admin | Published: November 16, 2016 07:39 PM2016-11-16T19:39:51+5:302016-11-16T19:39:51+5:30
आपल्या हक्काचे आणि विश्वासाने ठेवलेले पैसे बँक उपलब्ध करुन देत नसल्यामुळे एका खातेदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १६ : आपल्या हक्काचे आणि विश्वासाने ठेवलेले पैसे बँक उपलब्ध करुन देत नसल्यामुळे एका खातेदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जीत पटेल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि अपहाराची तक्रार दाखल केली आहे. नोटाबंदी झाल्यामुळे पत्राद्वारे पुर्वकल्पना देऊनही बँकेमधून पैसे न मिळाल्याने कोंढवा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. नोटा बंदीवरुन पोलिसांकडे देण्यात आलेली ही पहिलीच तक्रार आहे.
अॅड. तोसिफ शेख (वय 25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी लेखी तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास हा तक्रार अर्ज स्विकारला. शेख यांचे स्टेट बँक आॅफ इंडीयामध्ये बचत खाते आहे. खात्यामधील त्यांची जमा, ठेव रक्कम जेव्हा ग्राहकाला लागेल तेव्हा उपलब्ध करुन देणे बँकेला बंधनकारक असल्याचा कायदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घातली आहे. त्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला आहे.
शेख यांना बँकेमधून 30 हजार रुपये तातडीने काढावयाचे होते. त्यासाठी त्यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बँकेमध्ये अर्ज केला होता. त्यावेळी बँक व्यवस्थापकाने त्यांना हवी असलेली रक्कम देता येणार नाही असे सांगितले.
प्रधानमंत्री आणि गव्हर्नर यांनी मोठी रक्कम देण्यावर निर्बंध घातले आहेत. तातडीची गरज असल्याचे सांगूनही त्यांना रक्कम दिली गेली नाही. तसेच विश्वासाने ठेवलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उर्जीत पटेल यांच्या आदेशाने ही रक्कम परत न देता अन्यायाने विश्वासघात करुन फसवणूक केल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या तिघांविरुद्ध भादवि कलम 406, 409, 420, 34 नुसार तक्रार देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
- लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जराही विचार न करता हा निर्णय दामटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी विश्वासाने ठेवलेली माझ्या हक्काची रक्कम मला देणे हे बँकेला कायद्याने बंधनकारक आहे. शासनाचा कोणताही अध्यादेश कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. माझी रक्कम मला न देता अपहार केल्याचा माझा आरोप आहे. पुरेसे चलन आणि नोटा उपलब्ध करुन देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्यास शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल करणार आहे.
- अॅड. तौसिफ शेख