दोन्ही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा
By admin | Published: August 6, 2016 04:42 AM2016-08-06T04:42:44+5:302016-08-06T04:42:44+5:30
चंद्रकांत पाटील आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हेच अपघाताला जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार चिपळूण पोलिसांत दाखल
अलिबाग : महाड येथे सावित्री नदीवरील पूल कोसळून निष्पाप प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. ८८ वर्षांच्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलाची जीर्णावस्था झाल्याचे वृत्त वृत्तपत्रातही प्रसिध्द करण्यात आले होते. मात्र त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हेच जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार चिपळूण येथील ज्येष्ठ नागरिक तथा महाडच्या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेले तानू आंबेकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल केली.
सुदैवाने बचावलो
मंगळवारी राजापूर-बोरीवली याच एसटीने आॅपरेशनकरिता मुंबईला जाणार होतो. मात्र प्रकृती बरी नसल्याने जाणे रद्द केले. त्यामुळे सुदैवाने बचावलो. जर त्या दिवशी मुंबईला जाण्यासाठी निघालो असतो तर तक्रार दाखल करण्यास हयात राहिलो नसतो, अशी प्रतिक्रिया आंबेकर यांनी दिली.
तक्रार अर्ज रायगड पोलिसांकडे पाठवणार
ज्येष्ठ नागरिक तानू आंबेकर यांचा अर्ज आमच्याकडे आला आहे. मात्र घटनास्थळ रायगड जिल्ह्यात असल्याने आंबेकर यांचा हा
फिर्याद अर्ज रायगड पोलिसांकडे पाठविण्याची कार्यवाही करीत असल्याचे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद मक्केश्वर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>पत्रकार धमकी प्रकरणी मेहता यांच्याविरोधात पोलिसात तक्रार
महाड : साम वृत्तवाहिनीचे वार्ताहर मिलिंद तांबे यांना धमक ी तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात साम वाहिनीच्या संपादकांनी तक्रार दाखल केली आहे.सावित्री पूल दुर्घटनेच्या ठिकाणी गुरुवारी भाजपा कार्याकर्त्यांसमवेत पालकमंत्री भेट देण्यासाठी आले असता, मिलिंद तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नाला मेहता यांनी उद्धटपणे उत्तरे देत अर्वाच्च भाषा वापरली. तसेच यावेळी तांबेंना धमकावत धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. अशा प्रकारची तक्रार संपादकांनी दिली आहे. कायद्याचे रक्षक असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्याकडून कायद्याचे उल्लंघन केले गेले असून त्यामुळे तांबे त्यांच्या जीवीताला धोका असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
मिलिंद तांबे यांना दिलेल्या या धमकीचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले असून या धमकीच्या निषेध म्हणून मेहतांच्या संदर्भातले कोणतेही वृत आठ दिवस प्रसिद्ध न करण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतला आहे. (वार्ताहर)
नातेवाइकांना विभागीय आयुक्तांचा दिलासा
अलिबाग : महाड येथे सावित्री नदीवरील पुल वाहून गेल्यामुळे झालेल्या दुर्घटना परिसरात विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी पाहणी केली. येथे सुरु करण्यात आलेल्या नियंत्रण व मदत कक्षात जमलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांसमवेत चर्चा करु न त्यांना दिलासा दिला. यावेळी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक, उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते, तहसिलदार संदिप कदम उपस्थित होते.
महाड येथे घडलेली ही दुर्घटना अत्यंत दुर्देवी असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे प्रशासना समोर असलेले महत्वाचे कार्य आहे. प्रशासन बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सर्वस्तरावरु न शोधकार्यास मदत होत आहे. सर्वांनी प्रसंगावधान राखून संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रशासन आपल्या सोबत असल्याचे सांगून त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांना दिलासा दिला. तसेच शोध पथकाबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा करु न मार्गदर्शन केले.