राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 08:09 PM2017-01-16T20:09:33+5:302017-01-16T20:20:45+5:30
छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल बेताल व अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
सिंदखेडराजा (बुलडाणा) : छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरूध्द सिंदखेडराजा पोलिस स्टेशनमध्ये १६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
अखिल भारतीय छावा संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष अमरदीप देशमुख यांनी सिंदखेडराजा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले की, काही वृत्तवाहिन्या तसेच फेसबुक व व्हॉट्सअप सोशल मिडीयावर छत्रपती संभाजी महाराजाबद्दल राज ठाकरे यांनी अपमानजनक वक्तव्य करून संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. त्यामुळे लाखो शिवभक्तांच्या भावना दुखवल्या आहेत.
याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना त्वरीत अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
या तक्रारीवरून राज ठाकरे यांच्याविरोधात कलम ५०५ भादंवी १८६० गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अमरदिप देशमुख यांच्यासह दीपक किंगरे, बाळासाहेब शेळके, अमोल राखुंडे, गजानन उगले, विनोद झोरे, कैलास व्यवहारे, अभिजीत राजे यांनी केली आहे. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही ठाणेदार एस.एम. जाधव हे करीत आहेत.
(शहर प्रतिनिधी)