"टिपू सुलतानचा चौथरा उभारणाऱ्या फारुक शहांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 05:24 PM2023-10-25T17:24:47+5:302023-10-25T17:25:39+5:30
सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
Tipu Sultan Memorial Issue: राज्यात सर्वत्र शांततेचे वातावरण असतांना धुळ्याचे आ. फारूक शहा यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टिपू सुलतान यांचा चौथरा उभारल्याने तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्याची काम केले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे धुळे पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
आ. फारुक शहा यांनी शासकीय निधीचा दुरोपयोग करून टिपू सुलतानचे स्मारक विनापरवानगी उभारून शासकीय यंत्रणा पायदळी तुडवून सकल हिंदू समाजाला डिवचण्याचे काम या आमदाराने केले आहे. धुळे शहरात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावी हाच त्यामागचा उद्देश असल्याने त्याच्यावर देशद्रोहाची कारवाई व्हावी अन्यथा सकल हिंदू समाज तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
६ जून २०२३ रोजी धुळे शहरातील शंभर फुटी रोडावरील वडजई चौकात मुस्लीम वस्तीत शासनाची कुठलीही परवानगी न घेता आ. फारुख शाह यांनी विनापरवानगी चौथरा बांधून त्याचे टिपू सुलतान चौक असे नामकरण केले. सदर बांधकाम निष्काशित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्यमंत्री, गृह मंत्री तसेच पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त (धुळे) यांच्याकडे तक्रार अर्ज करण्यात आला. त्याची दखल घेत प्रशासनाने संबंधित ठेकेदार यांचेकडुन तो चौथरा निष्कासित केला. त्यानंतर काही समाजकंटकांकडून सोशल मिडीया अकाऊंटवर तक्रारदारांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुध्द आपत्तीजनक लिखाण करण्यात आले. त्यामुळे धर्मवंश व भाषा आदी कारणांवरून शत्रुत्व वाढविण्याचे काम तसेच धार्मिक भावना व धर्माचा हेतुपुरस्पर अवमान करुन सार्वजनिक शांततेविरुध्द खोटी विधान व अफवा प्रसारीत करण्यात येत आहेत. तसेच मनपाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिपत्याखाली असलेल्या जागेवर विनापरवाना चौथऱ्याचे बांधकाम करुन सार्वजनिक शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केले आहे.
तक्रारीचा राग मनात धरुन नासीर खान, आरीफ मिरचीवाले, शाकीब शेख, सरफराज शेख, शेख हाजुसाब, मुस्तकीन शेख, अनिस शेख, अब्दुल सरकार, अबु सुफियान यांनी चौथरा निष्काषित झाल्याने विचलित होऊन मुस्लीम समाजातील लोकांकडुन सोशल मिडीया अकाउंटवर हिंदू बांधवांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. त्यामुळे आ. फारुख शहा व अन्य लोकांविरुध्द गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने सदर चौथरा काढला. मात्र ज्यांनी चौथरा बांधला. ज्यांनी शासकीय निधी वापरला. अशा कामास प्रशासनाने मात्र त्यांना पाठीशी घातले. त्यांच्यावर मात्र गुन्हा देखील दाखल केला गेला नाही. त्यामुळे समाजात नाराजीचा सूर बघण्यास मिळतो आहे. याबाबात सोमवारी सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत गुन्हा नोंद करणार का? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.