इफेड्रीन प्रकरणी दोषारोपपत्र दाखल
By admin | Published: October 6, 2016 05:36 AM2016-10-06T05:36:12+5:302016-10-06T05:36:12+5:30
इफेड्रीन तस्करीप्रकरणी एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. या कंपनीचा संचालक मनोज जैनसह चार जणांविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूर न्यायालयात ४८७ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे
अमित सोमवंशी , सोलापूर
इफेड्रीन तस्करीप्रकरणी एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. या कंपनीचा संचालक मनोज जैनसह चार जणांविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूर न्यायालयात ४८७ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. कंपनीतील दैनंदिन चालणाऱ्या व्यवहाराबाबत कंपनीचे पूर्णवेळ संचालक मनोज जैन व कंपनीचे कार्यकारी चेअरमन अजित कामत, अकार्यकारी संचालक राजेंन्द्र कैमल, व्यावसायिक व्यवस्थापाक प्रभाकर हजारे हे जबाबदार असल्याचे दोषारोपत्रात म्हटले आहे.
चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत शेकडो टन इफेड्रीन जप्त करण्यात आल्यानंतर रोज नवनव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत़‘एव्हॉन’ला अन्न औषध प्रशासन विभागाकडून परवाना क्रमांक पीडी/१२५ अन्वये आठ प्रकारच्या औषध पावडरचे उत्पादन करण्यासाठी साठी १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत परवाना देण्यात आला होता. परंतु कंपनीने डी.एल.इफ्रेड्रीन बेस या मंजुरी नसलेल्या औषधी पावडरची दोन वेळा दोन कंपन्यांना विनारपवाना विक्री केली. कंपनीने उत्पादन विषयक इ व फ मध्ये क्षेत्रीय संचालक, गुंगीगारक औषधीद्रव्ये नियंत्रण केंद्र, मुंबई यांना तिमाही अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. तरीही कंपनीने जुलै ते संप्टेंबर २०१३, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१३ व जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांचा कालावधीत तिमाही अहवाल क्षेत्रीय संचालक गुंगीकारक औषधद्रव्ये मुंबई यांना पाठविलेला नाही. तपासात पोलिसांनी वीस साक्षीदारांचे जवाब नोंदवून घेतले.