पीटर मुखर्जीवर आरोपपत्र दाखल

By admin | Published: February 17, 2016 03:13 AM2016-02-17T03:13:50+5:302016-02-17T03:13:50+5:30

बहुचर्चित शिना बोरा हत्याकांड प्रकरणी सीबीआयने मंगळवारी पीटर मुखर्जीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. यात ४७ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आलेल्या आहेत

Filed the charge sheet on Peter Mukherjee | पीटर मुखर्जीवर आरोपपत्र दाखल

पीटर मुखर्जीवर आरोपपत्र दाखल

Next

डिप्पी वांकाणी,  मुंबई
बहुचर्चित शिना बोरा हत्याकांड प्रकरणी सीबीआयने मंगळवारी पीटर मुखर्जीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. यात ४७ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आलेल्या आहेत. एका साक्षीदाराच्या जीविताला धोका असल्याचे कारण देत सीबीआयने नुकताच त्याचा जबाब सिलबंद सादर केला आहे.
सीबीआयने ई मेल आणि कॉल रेकॉर्डवरुन घेतलेल्या माहितीवरुन अनेक बाबींचा उलगडा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पीटरचा मुलगा राहुलसोबत शिनाचे संबंध हाच या हत्याकांडामागचा हेतू असल्याचे दिसून येत आहे. या आरोपपत्रात पीटर यांच्या आर्थिक घडामोडीबाबत काही उल्लेख नाही. अर्थात या संदर्भात पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. शिनाला मारण्याचा कट हा पूर्वी ९ मार्च २०१२ चा होता. शिनाच्या हत्येनंतर ई मेलमध्ये शिनाचा उल्लेख अतिशय वाईट शब्दात केला होता.
इंद्राणी आणि तिचा पूर्वीचा पती संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सीबीआयने पीटरविरुद्ध ठेवले आहेत. भादंविच्या कलम ३६४, ३०२, ३२८, २०१, २०३, ३०७, ४२०, ४६८ आणि ४७१ नुसार हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. न्यायालयाने पीटरला २९ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.
पीटर मुखर्जीच्या आर्थिक बाबींचा समावेश असलेले एक पुरवणी आरोपपत्र आम्ही लवकरच दाखल करु, असे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यातून हे सिद्ध होईल की, शिनाचे राहुलशी असलेले संबंध पीटर व इंद्राणीला मान्य नव्हते. यात पीटरच्या एका मित्राचा प्रितुल संघवी याचा जबाब आहे. पीटरने याच प्रितुलला सांगितले होते की, आम्हाला शिना व राहुलचे हे संबंध मान्य नाहीत.
पीटरने राहुलला २७ मे २०१२ रोजी एक मेल पाठविला होता. शिनाच्या हत्येनंतर दोन महिन्यांनी पाठविलेल्या या मेलमध्ये पीटरने स्पष्ट सांगितले होते की, जर तुला कोणी शिनाबाबत विचारणा केली तर त्यांना इंद्राणीशी बोलण्यास सांग. दरम्यान, सीबीआयने दिल्लीतील एका फ्लॅटच्या सेलडीडचे कागदपत्रही सादर केले आहेत. पीटर आणि इंद्राणी यांच्यातील २४ व २५ एप्रिल २०१२ चे कॉल रेकॉर्डही सीबीआयने समोर आणले आहे. शिनाचा मृतदेह नष्ट केल्यानंतर इंद्राणीने पीटरसोबत २५ रोजी ९२४ सेकंद संभाषण केले होते. तर २४ एप्रिल रोजी दुपारी १.३६ ला पीटरने इंद्राणीला फोन केला होता. यावेळी ते २४२ सेकंद बोलले होते. तर त्यानंतर अर्ध्या तासाने या दोघांनी एसएमएसव्दारे संपर्क केला होता. तर रात्री १२.२० च्या सुमारास हे दोघे १३२९ सेकंद बोलले होते.
शिनाने तिच्या जवळच्या मित्रांना पाठविलेल्या ई मेलचाही या आरोपपत्रात समावेश आहे. शिनाच्या मृत्यूच्या तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २६ आॅगस्ट २००९ रोजी पाठविलेल्या या ईमेलमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की, कशाप्रकारे तिची नोकरी जात होती.पण, इंद्राणीच्या ओळखीमुळे ती कायम राहिली. तथापि, २८ आॅगस्ट २००९ रोजीच्या मेलमध्ये शिनाने आपल्या आईबद्दल इंद्राणीबद्दल अपशब्द वापरले आहेत. ती एक चांगली आई नाही आणि ती आपल्याला कशाप्रकारे टॉर्चर करते हे शिनाने यात सांगितले आहे. पीटर मुखर्जीच्या अंगात पट्ट्यांचा गुलाबी शर्ट होता. तो न्यायालयात निस्तेज दिसला. तो त्याचा भाऊ गौतम आणि त्याच्या बायकोशी बराचवेळ बोलत होता. गौतम आणि त्याची बायको न्यायालयात आले होते. पीटरने ‘लोकमत’ला सांगितले की तो तुरुंगात आरोपपत्राचा तपशिलाने अभ्यास करील. पीटर तुरुंगामध्ये आल्यापासून त्याचे वजन घटले. ही बाब माझ्यासाठी चांगलीच आहे, असेही त्याने सांगितले. मी निर्दोष आहे हे माझे म्हणणे आजही कायम आहे, असे पीटर म्हणाला. गौतम मुखर्जीने आरोपपत्राने मी निराश झाल्याचे सांगितले.भेदभावाची वागणूक : २००५ ते २००८ या कालावधीत मुखर्जीने विधी आणि शीना यांना दरमहा कसे पैसे दिले हे आरोपपत्रात दाखविण्यात आले आहे. त्यामगचा उद्देश, इंद्राणी आणि पीटर मुखर्जी हे कसे दोघे शीना आणि विधी यांच्यात भेदभाव करायचे. शीनाऐवजी विधीला जास्त पसंती मिळायची.
मोबाइल कुठे आहे? : भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी देवेन भारती आणि निरीक्षक अलकनुरे हे आरोपपत्राचे भाग आहेत. २०१२ मध्ये पीटर आणि इंद्राणीने आमच्याशी संपर्क साधला त्यावेळी शीनाचा मोबाईल शेवटचा सापडला ते ठिकाण विमानतळाजवळ असावे, असे या दोघांनी आरोपपत्रात म्हटले. तथापि, सीबीआय हा फोन अजून जप्त करू शकलेली नाही.
साक्षीदाराच्या जीविताला धोका : पीटर मुखर्जी हा प्रभाव टाकू शकणारी व्यक्ती आहे आणि त्यामुळे ३२ क्रमांकाच्या साक्षीदाराच्या जीविताला धोका आहे. आम्ही या साक्षीदाराचे निवेदन सीलबंद पाकिटातून सादर करीत आहोत, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.
योजना रद्द केली : केंद्रीय गुप्तचर खात्यातील (सीबीआय) वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखर्जीच्या कारचालकाकडून ताब्यात घेतलेले रिव्हॉल्व्हर हे मिखाईलने जर काही विरोध केला असता तर त्याला ठार मारण्यासाठी मिळविण्यात आले होते, परंतु संजीव खन्नाने दोन मृतदेहांची एकाच दिवशी विल्हेवाट लावणे शक्य होणार नाही, असे सांगून ती योजना रद्द केली. मुखर्जींसाठी रायने काम करणे थांबविल्यानंतरही इंद्राणीने त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत सुरूच ठेवली होती, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Filed the charge sheet on Peter Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.