सॉफ्टवेअर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Published: January 16, 2017 06:05 AM2017-01-16T06:05:04+5:302017-01-16T06:05:04+5:30
एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी या संगणक प्रणालीसाठी २२५ कोटींचा व्यवहार करण्यात आला.
मुंबई : एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी या संगणक प्रणालीसाठी २२५ कोटींचा व्यवहार करण्यात आला. मात्र, ती कार्यान्वित करण्यासाठी कोणतीही जाहिरात अथवा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनियमित व्यवहाराबाबत केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २०१४ मध्ये याबाबत सर्वप्रथम तक्रार केली होती. त्यानंतर, केंद्रीय दक्षता आयोगाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग केली होती. त्यांच्या तपासात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने, एअर इंडियाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत असल्याचे सीबीआयने गलगली यांना कळविले आहे.
दरम्यान, माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या माहितीमध्ये एअर इंडियाने कळविले होते की, संचालक मंडळाने एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डायरोक्टरेट जनरल आॅफ सप्लायर्स अँड डिस्पोजल यांच्या दराप्रमाणे २२५ कोटी निश्चित करण्यात आले. त्यामुुळे त्याबाबत जाहिरात देण्यात आली नाही. मात्र, ही पद्धत अयोग्य असल्याचे नमूद करत, गलगली यांनी त्याबाबत चौकशी करण्याची तक्रार केंद्रीय सतर्कता आयोगाकडे केली होती.(प्रतिनिधी)
>चौकशी सुरू
याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती विचारली असता, आयोगाने कळविले आहे की, एअर इंडिया, सॅप एजी आणि आयबीएमच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.
आयोगाने सर्व कागदपत्रांची चौकशी करून, सीबीआयला गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, सीबीआयकडून त्याचा तपास सुरू आहे.