औरंगाबादेत साहित्यिकांनी भिरकावल्या फायली
By Admin | Published: July 11, 2015 01:46 AM2015-07-11T01:46:40+5:302015-07-11T01:46:40+5:30
मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मतदार यादीतील घोळावरून उमेदवारांनी शुक्रवारी मसापमध्ये
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मतदार यादीतील घोळावरून उमेदवारांनी शुक्रवारी मसापमध्ये धाव घेऊन पीठासीन अधिकाऱ्यासमोर साहित्य संस्कृतीचे ‘आगळेवेगळे दर्शन’ घडविले. आक्रमक पवित्रा घेत त्यांनी फायलीतील कागदपत्रे फाडत भिरकावल्याने मसापमधील वातावरण तापले. क्रांती चौक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्ही गटांच्या लोकांना ठाण्यात नेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणी एका गटाने तक्रार अर्ज दाखल केला आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. मतदार यादी प्रकाशित झालेली आहे. मतदार यादीत अनेक घोळ असल्याचे सभासदांच्या निदर्शनास आले. मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांचे पत्ते बदलण्यात आल्याचा परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचा आक्षेप आहे. हा आक्षेप नोंदविण्यासाठी उमेदवार प्रा. ललित अधाने, डॉ. सतीश खुल्लड, प्रा. राजीव जहागीरदार, प्रा. पुंडलिक कोलते, प्रा. भारत खैरनार, प्रा. पवार, प्रा. गजानन सानप आदी शुक्रवारी सकाळी मसाप कार्यालयात गेले. पत्ते चुकीच्या पद्धतीने नोंदविण्यात आल्याने सुमारे १६८ मतदारांना अद्याप मतपत्रिका प्राप्त झालेल्या नाहीत. काहींचा पत्ता हा बीअर बार, रेस्टॉरंटचा देण्यात आला आहे. काही जणांना दोन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. याबाबत काय कार्यवाही करणार? असा जाब त्यांनी प्रा. कवडे यांना विचारला. त्या वेळी प्रा. कवडे यांनी जे मतदार तक्रार करतील, त्यांना दुसरी मतपत्रिका देण्यात येईल, असे सांगितले.
यावर उपस्थितांचे समाधान न झाल्याने त्यांचा पारा चढला. काहींनी तेथील मतदारयादीची फाईल फाडली आणि प्रा. कवडे यांच्या अंगावर फेकली. त्यामुळे वाद अधिकच चिघळला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मसापमधील संभाव्य राडेबाजी रोखली गेली. (प्रतिनिधी)