मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Published: August 16, 2016 08:50 PM2016-08-16T20:50:20+5:302016-08-16T20:50:20+5:30
मनपा प्रशासन आणि जलवर्धन संस्थेद्वारे खोदण्यात आलेल्या शोष खड्ड्यातील पाण्यात बुडून रविवारी दोन बालकांचा मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 16 - आदर्श कॉलनीमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६च्या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन संस्थेद्वारे खोदण्यात आलेल्या शोष खड्ड्यातील पाण्यात बुडून रविवारी दोन बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खदान पोलिसांनी बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, मनपाचे संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या शोषखड्ड्यात सिद्धार्थ राजेश घनगावकर आणि कृष्णा राकेश बहेल या दोन बालकांचा मृत्यू झाला होता.
आदर्श कॉलनी परिसरातील मित्रनगरला लागून असलेल्या वसाहतमधील रहिवासी राजेश घनगावकर यांचा मुलगा सिद्धार्थ (७) आणि याच परिसरातील रहिवासी राकेश बहेल यांचा मुलगा कृष्णा (१०) हे दोघे मनपाच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर खेळत होते. या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन या संस्थेने खोल चर खोदलेले होते. यामध्येच १० फूट खोलीचे तीन शोषखड्डे खोदण्यात आले होते. या शोषखड्ड्यांचे बांधकाम पूर्ण न केल्याने खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कृष्णा आणि सिद्धार्थ हे दोघे येथे खेळत असतानाच ते शोषखड्ड्यात पडले. शोषखड्ड्यात गाळ असल्याने दोघेही या गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला. जलवर्धन संस्थेने बांधलेल्या या तीन शोषखड्ड्यांची कामे त्यांनी अर्धवट केली होती. तसेच या शोषखड्ड्यात पाणी साचल्याने त्याला तारेचे कुंपण घेणे गरजेचे होते. मात्र, जलवर्धन संस्थेने ना तारेचे कुंपण घेतले, ना या ठिकाणी धोका असल्याचे फलक लावले. त्यामुळे दोन बालकांचा बळी गेला. जलवर्धन संस्थेने केलेल्या अर्धवट कामामुळे आणि मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दोन चिमुकल्यांचा जीव गेला असून, या प्रकरणी सिद्धार्थचे वडील राजेश घनगावकर यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, मनपाचे संबंधित अभियंता, कंत्राटदार यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------
अधिकाऱ्यांवरील गुन्हे नॉन बेलेबल
मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे नॉन बेलेबल असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील जलवर्धन संस्थेच्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करण्याची मागणी बालकांच्या नातेवाइकांनी केली आहे.