जुहू येथे प्रार्थना इमारतीला लागलेल्या आगी प्रकरणी बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 10:48 AM2017-09-07T10:48:13+5:302017-09-07T10:51:07+5:30
जुहू येथील कैफी आझमी पार्कलगतच्या प्रार्थना बिल्डिंगमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला.
मुंबई, दि. 7 - जुहू येथील कैफी आझमी पार्कलगतच्या प्रार्थना बिल्डिंगमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी जुहू पोलिसांनी संबंधीत बांधकाम कंपनीविरोधात ३०४ (अ) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून चौकशी सुरु असल्याची माहिती जुहूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. सध्या बारा जणांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आणि आठ जणांची प्रकृती स्थिर आहे. तर अन्य सहा जणांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे. जुहू येथील बांधकाम सुरू असलेल्या एका 13 मजली इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने इमारतीला आग लागली.
बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास येथील प्रार्थना इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. तेथे असलेल्या लाकडी आणि भंगाराच्या साहित्यामुळे आग भडकली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आगीवर ताबा मिळवला. पण या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. जखमी आणि मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे कामगार असल्याची माहिती आहे.