अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाविरोधात गुन्हा दाखल
By admin | Published: April 10, 2017 04:56 PM2017-04-10T16:56:59+5:302017-04-10T16:56:59+5:30
૪५ वर्षीय इसमाच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 10 - लोणावळ्याजवळील ओळकाईवाडी गावचे हद्दीत दोन अल्पवयीन मुलींना पैसे व पाणीपुरीचे आमिष दाखवत त्यांच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या दोन जेष्ठ नागरिकांसह एका ૪५ वर्षीय इसमाच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार विष्णू मामाजी गुडेकर (वय ७१), पांडुरंग यशवंत धोंगडे (वय ७५) आणि अनंत राजकुमार गुप्ता (वय ४५, सर्व रा. ओळकाईवाडी, कुसगाव बु ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादी यांची ११ वर्षीय मुलगी आणि तिची १० वर्षीय मैत्रीण यांना पैशाचे आणि पाणीपुरीचे आमिष दाखवून त्यांना वरील तिघांनी घरात बोलावून त्यांचे अंगावरील कपडे काढून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ सह बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२चे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख याप्रकरणी तपास करत आहेत.
महिलांनी दिला नराधमांना चोप
नातीच्या वयाच्या मुलींसोबत अश्लिल चाळे करणार्या दोन ज्येष्ठ नागरिकांसह एका इसमाला महालक्ष्मी महिला मंचाच्या महिलांनी चांगलाच चोप दिला. नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या सत्तरीच्या वयातील या नराधमांनी दोन लहान अल्पवयीन मुलींना चाँकलेटच आमिष दाखवत त्यांच्या राहत्या घरी नेऊन लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणारी ही घटना मानवतेला व नात्याला काळीमा फासणारी आहे. पोलीसांनी आरोपींना कडक शासन करावे.