एफटीआयआय उभारणार फिल्मसिटी
By admin | Published: March 11, 2016 01:54 AM2016-03-11T01:54:56+5:302016-03-11T01:54:56+5:30
चित्रपटांसाठी लोकेशन्स शोधणे हे मोठ्या जिकिरीचे काम. पण रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, हॉटेल, बाग यांसारखी लोकेशन्स जर एकाच ठिकाणी आणि तीही पुण्यासारख्या सांस्कृतिक क्षेत्रात मिळाली
पुणे : चित्रपटांसाठी लोकेशन्स शोधणे हे मोठ्या जिकिरीचे काम. पण रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, हॉटेल, बाग यांसारखी लोकेशन्स जर एकाच ठिकाणी आणि तीही पुण्यासारख्या सांस्कृतिक क्षेत्रात मिळाली तर! आश्चर्य वाटले ना? मुंबईमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरी उभारण्याची पायाभरणी केली जात असताना पुण्यातही ‘फिल्म सिटी’ निर्मितीच्या योजना आखल्या जात आहेत. त्याही कलाकारांची फळी तयार करणाऱ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटकडून! संस्थेच्या वेताळ टेकडीजवळील जागेत ही फिल्मसिटी उभारली जाणार आहे.
एफटीआयआयला ‘सेंटर फॉर नॅशनल एक्सलन्स’चा दर्जा मिळण्याच्या हालचाली सुरू असताना संस्थेनेदेखील कार्यविस्ताराचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ३६ एकर जागेत दोन स्टुडिओ उभारण्याची योजना आहे. या दोन स्टुडिओबरोबरच चित्रीकरणासाठी चित्रनगरी उभारण्याचा विचार संस्था करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)
>> 1 एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनामुळे संस्थेचे कामकाज जवळपास ठप्प झाले होते. यामुळे केंद्राकडून (२०१२-२०१७) पाच वर्षांसाठी मंजूर झालेला ८० कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची भीतीही प्रशासनाला आहे.
2 यासाठी आॅफिसर्स आणि स्टाफ क्वार्टरचे बांधकाम सुरू झाले आहे. काही इक्विपमेंटची खरेदीदेखील करण्यात आली आहे. याबरोबरच एफटीआयआयने विविध प्रकल्पांचे नियोजन केले आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील संस्थेच्या परिसरातील जागा अपुरी पडत असून, वेताळ टेकडीजवळील जागेत हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
3 यामध्ये रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, हॉटेल, बाग, इमारती असे सेट उभे करण्यात येणार आहेत. हे सेट विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार असले तरी व्यावसायिक चित्रीकरणासाठी ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या प्रकल्पांना संस्थेच्या नियामक मंडळाने मान्यता दिली असल्याचे सांगण्यात आले.