चित्रपट महामंडळाचा ‘तमाशा’
By Admin | Published: January 7, 2016 01:19 AM2016-01-07T01:19:55+5:302016-01-07T01:21:34+5:30
सर्वसाधारण सभेत हाणामारी : गोंधळातच सात विषय मंजूर
कोल्हापूर : माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाच्या हिशेबातील १३ लाख रुपये ताबडतोब भरावेत, अन्यथा कामकाज सुरू न करण्याचा निर्णय सभासदांनी घेतल्याने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा प्रथेप्रमाणे बुधवारी सायंकाळी गोंधळ आणि मुंबईकर विरुद्ध कोल्हापूरकर सभासद यांच्यातील हाणामारीने पार पडली.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गोंधळातच ८ पैकी ७ विषय मंजूर करून विद्यमान कार्यकारिणीची सदस्य मागील दाराने निघून गेल्यानंतर याच ठिकाणी विरोधी सदस्यांनी समांतर सभा घेतली.
शाहू स्मारक भवन येथे बुधवारी दुपारी तीन वाजता सभेची सुरुवात विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी प्रस्तावनेने केली. कार्यवाह सुभाष भुरके
यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचन करून सभेपुढील विषय मांडण्यास सुरुवात केली. यामध्ये ज्येष्ठ सभासद अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी तत्कालीन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या कारकिर्दीत १० कोटी रुपये महामंडळाला मंजूर झाल्याबाबत विचारणा केली. यावर प्रसाद सुर्वे यांनी हे दहा कोटी महामंडळाला शासनाकडून मंजूर झाले नसून, ते चित्रनगरीच्या फेन्सिंगसाठी मंजूर झाले. त्यापैकी ७ कोटी ५० लाख रुपये या कामासाठी खर्च झाले आहेत, असे उत्तर दिले. कुलकर्णी यांचे या उत्तरावर समाधान झाले नाही. यानंतर रणजित जाधव, दिग्दर्शक यशवंत भालकर, आदींनी तत्कालीन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात महामंडळाचे ५० लाख रुपये खर्च करीत महामंडळाचे नुकसान केले. त्यापैकी १३ लाख रुपये स्वत: च्या खिशातून भरून देतो, असे सांगत मागील सभेत सभासदांसमोर आश्वासन दिले होते.ते अद्यापही पूर्ण न केल्याने आताच्या आता सभागृहात १३ लाखांचा धनादेश आणि त्यावेळी लिहून दिलेला बाँडपेपर सादर करावा, अशी मागणी केली. या मागणीनंतर मुंबईतील सभासद आणि कोल्हापुरातील सभासदांमध्ये प्रथम शाब्दिक बाचाबाची होवून वाद वाढला. यावेळी आनंद काळे , किसन कल्याणकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढतच गेला. मुंबईकर सभासद विरुद्ध कोल्हापूरकर सभासद एकमेकांच्या गळपट्टी धरून एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून सभागृहाबाहेरील बंदोबस्तासाठी उभे असलेले पोलीस सभागृहात दाखल झाले. त्यांनी काहीकाळ दोन्हीकडील सभासदांना आवरल्यानंतर पुन्हा सभा सुरू झाली. अध्यक्ष पाटकर यांनी सभेपुढील ८ विषयांपैकी ७ विषय आवाजी मताने मंजूर करून घेतले. नंतर गोंधळाला सुरुवात झाली. पुन्हा रणजित जाधव, यशवंत भालकर, आदी आक्रमक झाले. यावेळी अध्यक्षांना तुम्हाला अशा पद्धतीने कारभार करता येणार नाही. १३ लाखांच्या वसुलीचे काय ते बोला असे सांगितले. त्यानंतर पुन्हा पाटकर यांनी गोंधळातच सभा संपल्याचे जाहीर केले. यावर ज्येष्ठ दिग्दर्शक भास्कर जाधव, चित्रपट अभिनेते उमेश शिंदे, अभिनेते विलास रकटे, माजी अध्यक्ष मेघराज भोसले, दिग्दर्शक यशवंत भालकर, भालचंद्र कुलकर्णी यांनी विद्यमान कार्यकारिणीला व्यासपीठावर ५ मिनिटांत येण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला प्रतिसाद न देता सर्व कार्यकारिणी मागील बाजूने बाहेर गेली. सभेस उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, संजीव नाईक, सतीश बिडकर, अनिल निकम, अलका कुबल, प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, सतीश रणदिवे, इम्तियाझ बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती उपस्थित होते. पाठीमागील दाराने सर्व संचालक बाहेर
व्यासपीठावर निषेध सभेअगोदर भास्कर जाधव यांनी पाच मिनिटांत अपूर्ण राहिलेली सभा पुन्हा सुरू करा म्हणून आवाहन केले. मात्र, या आवाहनास प्रतिसाद न देता अध्यक्ष पाटकर, संचालिका अभिनेत्री अलका कुबल, आदी मंडळी पाठीमागील दरवाजाने भवनाबाहेर पडली. यातील पाटकर, कुबल आणि अन्य संचालक मंडळी आॅटोरिक्षातून हॉटेलवर गेली.
महामंडळावर प्रशासक नेमा
तत्कालीन अध्यक्ष सुर्वे यांनी १३ लाखांचा व नंतरचा ७ लाख ५० हजारांचा हिशोब अद्याप पूर्ण न केल्याने जो घोटाळा झाला आहे, त्याबद्दल आपण त्यांच्या विरोधात तक्रार देऊ. याचबरोबर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणीही धर्मादाय आयुक्तांकडे करू, असे निषेध सभेत जाहीर केले. यावेळी चित्रपट अभिनेते उमेश शिंदे, अभिनेते विलास रकटे, माजी अध्यक्ष मेघराज भोसले, दिग्दर्शक यशवंत भालकर, भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह दोनशेपेक्षा अधिक सभासदांनी होकार दिला.
८ पैकी ७ विषय आवाजी मतदानाने मंजूर
२०१३ चा वृत्तांत वाचून कायम करणे, २०१३-१४, २०१४-१५ जमाखर्च, अहवाल मंजूर करणे, २०१५-१६चे अंदाजपत्रक मान्यता, २०१५-१६ करिता आॅडीटर्स नेमणुकीस मान्यता, महामंडळ कार्यालय नवीन वास्तू खरेदी विचारविनिमय व निर्णय घेणे, ‘अ’ वर्ग सभासदांकडून आलेल्या प्रश्न व सूचना यांचा विचार, निर्णय घेणे, ऐनवेळच्या आलेल्या विषयांवर अध्यक्षांच्या अनुमतीने चर्चा व निर्णय घेणे. तर क्रमांक पाचचा महामंडळाविरोधात कोर्ट केसीस सुरू असल्याने त्याकरिता संचालक मंडळाला निकाल लागेपर्यंत मुदतवाढ द्यावी, यावर चर्चा, निर्णय हा विषय सोडून ८ पैकी सात विषय सभेत आवाजी मंजूर करण्यात आले.
समन्वय समितीची शिष्टाई असफल
सभेच्या सुरुवातीला अध्यक्ष पाटकर यांनी बाबा पार्टे, निवासराव साळोखे, रामभाऊ चव्हाण, आदींचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख केला. याबाबत सभासदांमध्ये उलट सुलट चर्चा रंगली. या चर्चेमध्ये या चार नेत्यांनी मंगळवारी एका हॉटेलमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, यातील जे आवाज काढणारे सभासद होते, ते सर्व गप्प राहिले. मात्र, दुसरेच सभासद उठून बसल्याने ही शिष्टाई असफल झाल्याचे बोलले जात होते.
अशा पद्धतीने सर्वसाधारण सभेतून विद्यमान कार्यकारिणीने पळून जाणे आम्हाला मान्य नाही. दिलेल्या शब्दाला विद्यमान संचालक मंडळ आणि माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी जागले पाहिजे होते.
- विलास रकटे, ज्येष्ठ अभिनेते
ठरल्याप्रमाणे सुर्वे यांनी १३ लाख रुपये आणि बाँडपेपर देणे आवश्यक होते. अशा पद्धतीने सभा घेऊन विद्यमान संचालकांनी पळपुटेपणा केला. असा गोंधळ करत सभा घेण्याचे आधीच ठरले होते.
- यशवंत भालकर,
ज्येष्ठ दिग्दर्शक
आजच्या सभेतील विषय बहुमताने मंजूर झाले. ही सभा घटनेप्रमाणे पार पडली आहे. चित्रपट महामंडळाची निवडणूक एप्रिल महिन्यात होईल.
- विजय पाटकर, अध्यक्ष, अ. भा. चित्रपट महामंडळ