एफटीआयआयमध्ये चित्रपट महोत्सव सुरू
By Admin | Published: November 25, 2015 03:43 AM2015-11-25T03:43:19+5:302015-11-25T03:43:19+5:30
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी येथील पिएदाद इन्स्टिट्यूटमध्ये समांतर चित्रपट महोत्सव घेतला. अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पणजी : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी येथील पिएदाद इन्स्टिट्यूटमध्ये समांतर चित्रपट महोत्सव घेतला. अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट या ठिकाणी छोट्या पडद्यावर दाखवण्यात आले. ते पाहण्यासाठी इफ्फीतील काही निवडक प्रतिनिधींनीही आवर्जून हजेरी लावली.
सरकारची दहशत मात्र कायम आहे, असा एफटीआयआयचा माजी विद्यार्थी प्रतीक वत्स याने ‘लोकमत’ला सांगितले. हा चित्रपट महोत्सव होऊ नये यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पिएदाद इन्स्टिट्यूटला नोटीस बजावली. त्याला समर्पक उत्तर सेंटर फॉर पीस अॅण्ड सोशल जस्टिसन दिले आहे.
या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांना सेन्सॉर सर्टिफिकेट नाही, असा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक तो खुलासा करण्यात आल्याचे वत्स याने सांगितले. सकाळी ११ ते १ आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन सत्रांत मंगळवारी महोत्सवाचा पहिला दिवस झाला. (प्रतिनिधी)