चित्रपट उद्योगाला दुष्काळ दिसत नाही की असंवेदनशीलतेचा कळस?
By Admin | Published: April 25, 2016 03:00 AM2016-04-25T03:00:58+5:302016-04-25T03:00:58+5:30
भयंकर दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी नाना पाटेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयकुमार आणि आमीर खान यांसारखे अभिनेतेही पुढे आले आहेत
लोकमत स्पेशल , अनुज अलंकार -
भयंकर दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यासाठी नाना पाटेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षयकुमार आणि आमीर खान यांसारखे अभिनेतेही पुढे आले आहेत. त्याबद्दल या कलावंतांचे आभार. मात्र, यातून एक प्रश्न उपस्थित होतो की, केवळ एवढेच कलावंत पुढे का आले, उर्वरित सर्वांना काय झाले? याला असंवेदनशीलतेचा कळस म्हणू नये, तर काय म्हणावे.
मदतीसाठी कोणावर बळजबरी केली जाऊ शकत नाही, हे खरे आहे. तथापि, यात नैतिकता व संवेदनशीलतेचा प्रश्न उपस्थित होतो. एक काळ होता जेव्हा चित्रपट उद्योग राष्ट्रीय आपत्तीस मदतीसाठी सर्वांत आधी पुढे येत होता. दुष्काळ असेल किंवा पूर, भूकंप. संकट नैसर्गिक असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल.
देशाची सेवा आणि मदत करण्यात चित्रपट उद्योग कधीही मागे राहिला नव्हता. मात्र, आता दुष्काळाबाबत चित्रपट उद्योगाने काहीही देणे-घेणे नसल्याची जी भूमिका घेतली आहे ती निश्चितच चिंतादायक आहे. चित्रपट उद्योगातील मोठमोठे दिग्गज मौन बाळगत त्या राज्यातील लोकांच्या दैन्यावस्थेचा तमाशा पाहत आहेत. ज्या राज्याने त्यांना भरभरून दिले आहे.
याआधी असे संकट निर्माण झाल्यानंतर चित्रपट उद्योग एकजुटीने प्रयत्न करीत असे. कधी चॅरिटी शो करण्यात येत होते, तर कधी उदार मनाचे तारे मदत घेऊन संकटग्रस्त भागात जात होते. अभिनेत्यांनी गाव दत्तक घेतल्याची उदाहरणेही आहेत. मात्र, आता वाटते की, प्रत्येक जण अधू झाला आहे. आमच्या राज्यातील शेतकऱ्यांची किती दैना सुरू आहे याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसते.
संकटाची ही वेळ तर निघून जाईल. येणाऱ्या मान्सूनने परिस्थिती पालटेल, अशी आशा आहे; परंतु लाखो-कोट्यवधी रुपये कमावून आलिशान जीवन जगणाऱ्या ताऱ्यांचे हे दुर्लक्ष नेहमीच आठवणीत राहील. काही ताऱ्यांमध्ये माणुसकी उरली नसल्याचे हे द्योतक असून, याला निलाजरेपणाशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही.