चित्रपट क्षेत्र हा उद्योग व्हावा

By admin | Published: January 8, 2015 01:23 AM2015-01-08T01:23:21+5:302015-01-08T01:23:21+5:30

चित्रपटाच्या माध्यमातून फार मोठ्या निधीची देवाणघेवाण होते. हा एक मोठा उद्योग आहे. याला आता टेलिव्हीजन आणि प्रादेशिक सिनेमांचीही जोड लाभली आहे. पण अद्यापही चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा नाही.

Film industry should be a business | चित्रपट क्षेत्र हा उद्योग व्हावा

चित्रपट क्षेत्र हा उद्योग व्हावा

Next

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अभिनेता मनोज वाजपेयी आणि अर्जुन कपूर यांची लोकमतला भेट
राजेश पाणूरकर - नागपूर
चित्रपटाच्या माध्यमातून फार मोठ्या निधीची देवाणघेवाण होते. हा एक मोठा उद्योग आहे. याला आता टेलिव्हीजन आणि प्रादेशिक सिनेमांचीही जोड लाभली आहे. पण अद्यापही चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा नाही. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण होते ती अनेक ठिकाणेही पर्यटनाच्या दृष्टीने सरकार समोर आणू शकते. उद्योगाचा दर्जा या क्षेत्राला दिला तर उद्योगांना मिळणाऱ्या सवलतीही या क्षेत्रातील लोकांना मिळतील आणि या क्षेत्राची अधिक भरभराट होईल. याशिवाय संबंधित राज्य शासनाने चित्रिकरणासाठी काही स्थळे उपलब्ध करून दिलीतर यात दोन्ही बाजूने लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा द्यावा, अशी मागणी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अभिनेता मनोज वाजपेयी आणि अर्जुन कपूर यांनी केली. त्यांनी आज लोकमत भवनाला सदिच्छा भेट देऊन लोकमतच्या उपक्रमाबद्दल जाणून घेतले.
माझ्या भूमिकांसारखा मी नाहीच : अर्जुन कपूर
औरंगजेब आणि इश्कजादे, गुंडे सिनेमातून माझी इमेज ‘अँग्री यंग मॅन’ झाली. लोकांनाही मी त्याच भूमिकांमध्ये आवडायला लागलो. पण त्यानंतर ‘टू स्टेट्स’ मध्ये मात्र सरळ साध्या विद्यार्थ्याची भूमिका मी केली. माझी निर्माण झालेली प्रतिमा आणि ‘टू स्टेट्स’ माझी वेगळ्या पद्धतीची भूमिका पाहून रसिक मला स्वीकारतील का, हा प्रश्न मलाही पडला होता. पण या सिनेमाला यश लाभले आणि लोकांनीही मला स्वीकारले. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि समाधानाचा विषय आजही आहे. मी प्रामुख्याने ‘अँग्री यंग मॅन’च्या भूमिका केल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र मी तसा नाही. लोकांशी संवाद ठेवणारा, खूप गप्पा मारायला आवडणारा आणि जरा लाजाळू पद्धतीचेच माझे व्यक्तिमत्त्व आहे. पण कदाचित माझ्या चेहऱ्यात आणि लुक्समध्ये काही आक्रमकपणा दिग्दर्शकाला दिसला असेल आणि त्यांनी तो सिनेमात उपयोगात आणला, असे प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. प्रारंभीच्या काळात माझा एकही सिनेमा आलेला नव्हता आणि मी नवीन होतो. त्यामुळे माझी ओळख बोनी कपूरचा मुलगा अशीच होती. त्यानंतर मात्र माझी ओळख निर्माण झाली. आपल्या कामात समर्पण आणि सातत्य टिकविता आले पाहिजे, असे मला वाटते. एक कलावंत म्हणून मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. भविष्यात माझा तसाच प्रयत्न असणार आहे, अर्थात दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवला तर हे शक्य होईल. सिनेमाचे प्रमोशन करण्याची सध्या एक नवी पद्धत निर्माण झाली आहे. त्यात परिश्रम अधिक होत असले तरी त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशातल्या लोकांना समजून घेण्याची आणि त्यांच्या आवडी-निवडीशी रुबरु होण्याची संधी मिळते. खूप शिकायलाही मिळते.
कॉमेडीचा स्वभावच नाही : मनोज वाजपेयी
नाही म्हणजे नाहीच. प्रत्येक कलावंताचा एक पिंड असतो. कलावंतांला प्रत्येक भूमिका करता यायला हवी, हे मी मानतो पण प्रत्येकालाच प्रत्येक भूमिका ताकदीने करता येणे शक्य नाही. कदाचित माझ्यात ती कमतरता आहे, त्यामुळेच कॉमेडी भूमिकांमध्ये मी फारसा रमलो नाही. एखादी भूमिका मनाला भावली तरच त्यात जीव ओतता येतो. कॉमेडी करण्यात मी सहज नाही त्यामुळे कॉमेडी भूमिकांसाठीही माझा हट्ट नाही, असे मत प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याने व्यक्त केले. केवळ रोमॅण्टिक भूमिकामध्ये मी फारसा रमत नाही. मला ज्या पद्धतीच्या भूमिका आवडतात त्या भूमिका मी ताकदीने करण्याचा प्रयत्न करतो. मुळात भिकु म्हात्रे ने लोकांना हसविले आहे. त्यामुळे कॉमेडी भूमिका मी करूच शकत नाही, असे नाही. पण त्यात मी रमत नाही. यानंतर झुबेदासारखी भूमिका मिळाली तर करायला आवडेल पण आता मी चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे वयाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. काही बाबी स्वीकारता आल्या तर पुढचे पाऊल विचारपूर्वक टाकता येते, असे मला वाटते. चित्रपटांचे प्रमोशन करणे हा अनुभव खूप काही शिकविणारा आहे, असेही मनोज वाजपेयी यांनी सांगितले.
वडिलांची सिनेमा निवडताना
मदतच होते : सोनाक्षी सिन्हा
माझे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना चित्रपटसृष्टीचा मोठा अनुभव आहे. त्यामुळेच एखादा चित्रपट निवडताना मी त्यांचा सल्ला घेते. मी कुठला सिनेमा करावा वा करू नये, याचा निर्णय माझाच असतो. त्यांनी माझ्यावर कधीच बंधन टाकलेले नाही पण त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न असतो. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि जे करायचे ते विचार करून करायचे. त्यात स्वत:ला झोकून देत त्यासाठी परिश्रमाची तयारी ठेवायची, ही त्यांचीच शिकवण मी अभिनयातही पाळते आहे. मी घेतलेल्या निर्णयात माझ्या वडिलांचे मला नेहमीच सहकार्य लाभले आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी व्यक्त केले. जे सकारात्मक आणि चांगले आहे, ते करीत राहायचे, हा माझा मंत्र आहे. त्यामुळेच मला ज्यात सहजपणा वाटत नाही, अशा भूमिका मी स्वीकारतच नाही. निरोगी असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे झिरो फिगरच्या भानगडीत मी कधी पडलीच नाही. जी भूमिका मिळाली त्यावरच लक्ष कें द्रित केले आणि रसिकांनी मला स्वीकारलेही. चित्रपटाचे चित्रीकरण करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे हल्ली त्याचे प्रमोशन करणे झाले आहे. आता काळ बदलला आहे. आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकांमध्ये मिसळावे लागते आणि त्यांच्याशी वेगवेगळ्या माध्यमांमधून संपर्कात राहावे लागते. खरे तर चित्रपटानंतर त्यासाठी खूप लागून राहावे लागते आणि अधिकचे परिश्रमही होतात. पण यातून आपले व्यक्तिमत्त्व अधिक उंच होते, असे मला वाटते. ‘हॉलिडे’ हा चित्रपट खूप चांगला होता पण त्याचे प्रमोशन कमी पडले त्यामुळे तो रसिकांपर्यंत म्हणावा त्याप्रमाणात पोहोचू शकला नाही. ‘तेवर’ या चित्रपटाचे चित्रिकरण करताना मस्त मजा आली. हा सिनेमा आम्ही साऱ्यांनीच खूप एन्जॉय केला कारण सगळीच टीम यंग होती. खूप वेगवेगळ्या लोकेशन्सवर याचे चित्रीकरण करण्यात आले. प्रेमकथेत होणारी गुंतागुंत आणि त्यातून घडणाऱ्या अनेक घटनांचा हा सिनेमा रसिकांना नक्कीच आवडणार आहे, असे ती म्हणाली.

Web Title: Film industry should be a business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.