चित्रपटाचे बजेट नव्हे कथाबीजच महत्त्वाचे

By admin | Published: October 1, 2014 12:51 AM2014-10-01T00:51:19+5:302014-10-01T00:51:19+5:30

सध्या एखाद्या चित्रपटाचे बजेट किती, यालाच जास्त महत्त्व आले आहे. पण चित्रपट ही कलाकृती म्हणून पाहिले तर त्यात बजेट नव्हे कथाबीज आणि मांडणीच महत्त्वाची असते, असे मत ‘सोनाली केबल’

The film is not budget nor important | चित्रपटाचे बजेट नव्हे कथाबीजच महत्त्वाचे

चित्रपटाचे बजेट नव्हे कथाबीजच महत्त्वाचे

Next

‘सोनाली केबल’ चित्रपटाच्या चमूशी लोकमतचा संवाद
नागपूर : सध्या एखाद्या चित्रपटाचे बजेट किती, यालाच जास्त महत्त्व आले आहे. पण चित्रपट ही कलाकृती म्हणून पाहिले तर त्यात बजेट नव्हे कथाबीज आणि मांडणीच महत्त्वाची असते, असे मत ‘सोनाली केबल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि कलावंतांनी व्यक्त केले. ‘सोनाली केबल’ चित्रपटाचे दिग्दर्शक चारुदत्त आचार्य आणि कलावंत रिया चक्रवर्ती, अली फझल आणि राघव जुयाल यांनी लोकमत कार्यालयाला भेट देऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अनेक बाबी त्यांनी उलगडल्या. चित्रपट ही कलाकृती म्हणूनच पाहायला हवी आणि त्याचे मेकिंगही कलाकृतीच्याच अंगाने असले पाहिजे, असे मत यावेळी सर्वांनीच व्यक्त केले.
याप्रसंगी सर्वच कलावंतांचे लोकमतच्यावतीने स्वागत करण्यात आले. ‘सोनाली केबल’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणारी ‘मेरे डॅड की मारुती’ फेम रिया चक्रवर्ती म्हणाली, निव्वळ कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेला सिनेमा उत्कृष्ट असतो, असे मला तरी वाटत नाही. त्यापेक्षा अनेक मूलभूत गरजांसाठी आपल्या देशाला या पैशाची गरज आहे. हा सिनेमा अगदी सामान्य माणसाशी रिलेट होणारा आहे. मुंबईतल्या एका भागात जवळपास तीन हजार लोकांपर्यंत पोहोचून सेवा देणाऱ्या सोनाली केबल्सला एका बड्या कंपनीचा किती त्रास होतो आणि व्यवसायासाठी लहान कंपन्या गिळंकृत करताना किती खालच्या थरावर काही लोक उतरतात. या सामान्यत: आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांंवरच हा चित्रपट आकार घेतो. यात काम करताना मजा आली कारण कथेतच दम होता.
दिग्दर्शक चारुदत्त आचार्य म्हणाले, कॉमन मॅनने अनुभवलेलाच हा विषय असल्याने रसिकांना हा चित्रपट नक्की आवडेल. सामान्य माणसाला गृहित धरून त्याच्याशी कसेही वागले तरी चालते, असा काहीसा समज धनदांडग्यांचा होतो. पण सामान्य माणूस पेटला तर त्याची शक्ती काय असते, हेच या सिनेमात दाखविण्याचा प्रयत्न केला. यातल्या भूमिकांशीही लोक सहजपणे जुळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘फुकरे’ सिनेमातून समोर आलेला अली फझल म्हणाला, मी सध्याच मुख्य भूमिकेच्या शोधात नव्हतोच. पण ‘सोनाली केबल’ची कथा मला खूप आवडली. यातील माझी भूमिका महत्त्वाची आणि कथेला समोर नेणारी आहे. त्यात मला जास्त मजा आली. भविष्यात काही चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निमंत्रणे आहेत. लवकरच मुख्य भूमिकेतही मी रसिकांना दिसेन, असे तो म्हणाला. ‘डान्स इंडिया डान्स’मधील नृत्य कलावंत राघव जुयाल म्हणाला, नृत्य तर माझ्यात आहेच, पण अभिनयातही स्वत:ला जोखून पाहतो आहे आणि त्यात मजा येते आहे.(प्रतिनिधी)
लोकमतच्या उपक्रमाची सर्वांनीच केली प्रशंसा
लोकमततर्फे बेटी बचाव अभियान राबविण्यात येत आहे. तसेच लोकमततर्फे सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लब या सर्व वयोगटाकरिता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सर्व कलावंतांना देण्यात आली. याप्रसंगी रिया चक्रवर्ती, अली फझल आणि राघव जुयाल आणि चारुदत्त आचार्य प्रचंड प्रभावित झाले. त्यांनी या सर्व उपक्रमांची प्रशंसा केली. यावेळी बेटी बचाव अभियानात रिया चक्रवर्तीनेही सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त करून आपला संदेश या उपक्रमाच्या पोस्टर्सवर लिहिला. त्यानंतर सर्वांनीच आपल्या हस्ताक्षरात या उपक्रमाला पाठिंबा दर्शविणारा संदेश लिहिला.

Web Title: The film is not budget nor important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.