"अनेक कथांमधून भेदक प्रकाश टाकणारा जयंत", चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांची ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 12:23 PM2021-08-29T12:23:51+5:302021-08-29T12:30:00+5:30

Marathi playwright Jayant Pawar Death: जयंत पवार यांच्या निधनाबद्दल चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांनी दुःख व्यक्त केले आहे. श्रद्धांजली

Filmmaker Nitin Vaidya pays homage to veteran playwright Jayant Pawar | "अनेक कथांमधून भेदक प्रकाश टाकणारा जयंत", चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांची ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना श्रद्धांजली

"अनेक कथांमधून भेदक प्रकाश टाकणारा जयंत", चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांची ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना श्रद्धांजली

Next

मुंबई : ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे रविवारी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. मराठी भाषेतील एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे नाट्य क्षेत्रासह सगळीकडेच शोककळा पसरली आहे. जयंत पवार यांच्या निधनाबद्दल चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांनी दुःख व्यक्त केले आहे. 

जयंतचे जाणे खूपच क्लेशदायक आहे. खूप मोठा कथाकार, नाटककार, लेखक आणि छान माणुस, मित्र आपण गमावला आहे. गिरणी संपानंतरच्या गिरणगावातील सामाजिक, आर्थिक आणि मानसिक अवस्थेवर ‘अधांतर’सारखं नाटक तसेच अनेक कथांमधून भेदक प्रकाश टाकणारा जयंत हा आजच्या काळातला एक अत्यंत महत्वाचा भाष्यकार होता. जयंत मराठीतीलच नव्हे तर एकुणातच भारतातला आजचा सर्वोत्कृष्ट कथाकार होता. प्रथितयश होऊनही निगर्वी आणि आपल्या भूमिकेवर ठाम असलेला सर्जनशिल लेखक होता. देशातल्या सामाजिक सौहार्दावर गेल्या काही वर्षात जो घाला आला, त्यविरूद्ध प्रकृती ठिक नसतानाही जयंत उभा ठाकला होता, असे नितीन वैद्य म्हणाले.

याचबरोबर, नाट्य समीक्षक म्हणून रंगभूमीवरील नवीन, प्रयोगशिल पिढीचा तो खंदा पाठीराखा होता. ‘फिनिक्सच्या राखेतून उठलाय मोर’ या त्यांच्या कथासंग्रहातील ‘६७२ रूपयांचा सवाल अर्थात युद्ध आमचे सुरू’ या कथेवर चित्रपट करण्यासाठी तीनएक वर्षांपूर्वी मी त्याला भेटलो. या चित्रपटाचं पटकथा व संवाद लेखन जयंतनेच करावे, असा आमचा आग्रह होता. त्याने तो तात्काळ मान्यही केला. प्रकृतीची काळजी घेत त्याने ते लिखाण केलंही. या सगळ्या प्रक्रियेत जयंतचे मोठेपण सतत जाणवत गेले, असे नितीन वैद्य यांनी सांगितले.

याशिवाय, जानेवारी २०२० मध्ये ‘भाऊबळी’चे चित्रीकरण पार पडले आणि कोविडचं संकट आले. त्यानंतर निर्मितीची सारी प्रक्रियाच मंदावली. दोन लॉकडाऊनमुळे बंद असलेले स्टुडियो, तंत्रज्ञांची उपलब्धता यामुळे ‘भाऊबळी’ अडकून पडला… तो आता तयार झाला असून जयंतला दाखवायचा होता… ते राहूनच गेले… आता त्याच्या शिवायच हा चित्रपट रिलीज करावा लागणार, याची सल कायम मनात असेल… हे खूप दु:खद आहे, असे म्हणत नितीन वैद्य यांनी जयंत पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित 
'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी जयंत पवार यांना 2012 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. अधांतर हे नाटक खूप गाजले होते. 2014 साली महाड येथे झालेल्या 15व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते.

जयंत पवार यांची साहित्य संपदा!
- अधांतर
- काय डेंजर वारा सुटलाय
- टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)
- दरवेशी (एकांकिका)
- पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
- फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
- बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक)
- माझे घर
- वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)
- वंश
- शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)
- होड्या (एकांकिका)

Web Title: Filmmaker Nitin Vaidya pays homage to veteran playwright Jayant Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी