पत्नीच्या जाचाला कंटाळून चित्रपट निर्मात्याची आत्महत्या
By admin | Published: May 15, 2017 05:53 AM2017-05-15T05:53:13+5:302017-05-15T05:53:13+5:30
ढोल ताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी रविवारी हॉटेलमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘ढोल ताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी रविवारी हॉटेलमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली. त्यात पत्नीच्या जाचाला कंटाळून जीवन संपवीत असल्याचे म्हटले आहे.
जागतिक मातृदिनी, ‘एका गोष्टीचा खूप आनंद होतो आहे, की मी माझ्या आईबरोबर राहणार आहे’ असे भावनिक विधान त्यांनी त्यात केले आहे. चित्रपटाच्या निर्मितीनंतर अतुल हे कर्जबाजारी देखील झाले होते.
अतुल बाजीराव तापकीर (३५, रा. पिंपळे निलख, पुणे) हे कुटुंबीयांशी वाद झाल्यामुळे रविवारी रात्री हॉटेलमध्ये राहण्यास आले होते. सकाळी खोली स्वच्छ करायला कर्मचारी आल्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. एरंडवणा पोलिसांनी खोलीची तपासणी केली. त्यानंतर फेसबुकवरील तापकीर यांच्या पोस्टमुळे पत्नी आत्महत्येला कारणीभूत असल्याचे समोर आले. तापकीर यांनी २०१५ मध्ये ‘ढोल ताशे’ चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र अपेक्षित व्यवसायाअभावी त्यांना मोठा तोटा झाला होता. त्यानंतर ते व पत्नी प्रियंका यांच्यात वादाला सुरुवात झाली. प्रियंका यांनी अतुल यांना घराबाहेर काढले. त्यांना भावाच्या मदतीने मारहाणही केली तसेच फोनवर शिवीगाळ केली, असे तापकीर यांनी म्हटले आहे.
---------
वडिलांनी मुले सांभाळावी
वडिलांनी माझ्या दोन मुलांचा सांभाळ करावा. रोजचा मानसिक छळ मला सहन होत नसल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
-----------------
पोलिसांवर आरोप;
मुख्यमंत्र्यांना विनंती
माझी मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, जसे पोलीस महिलांची बाजू ऐकून घेतात तशीच पुरुषांचीही ऐकून घेतली पाहिजे. मला आणि वडिलांना अटक होऊ नये म्हणून पोलिसांनी १० हजार मागितले. पोलीस म्हणाले, तू बरोबर आहेस; हे आम्हाला कळते. पण पहिली तक्रार तिने केली आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल, असे नोटमध्ये म्हटले आहे. अटक होऊ नये म्हणून १० हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर पोलिसांनी प्रियंकालाही रागावायला पाहिजे होते. बरेच पोलीस माझे मित्र आहेत. ते खूप चांगले आहेत. पण मला आलेल्या अनुभवाबद्दल मी भूमिका मांडतो आहे, असे अतुल यांनी नमूद केले आहे.