छुप्या कॅमेऱ्याद्वारे टवाळखोरांचे चित्रीकरण
By admin | Published: August 24, 2016 01:19 AM2016-08-24T01:19:51+5:302016-08-24T01:19:51+5:30
महिला, मुलींच्या प्रभावी सुरक्षेसाठी आता पुणे विभागात पोलिसांच्या वतीने ‘निर्भया’ पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
बारामती : महिला, मुलींच्या प्रभावी सुरक्षेसाठी आता पुणे विभागात पोलिसांच्या वतीने ‘निर्भया’ पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकाची शहरातील रोडरोमिओ, टवाळखोरांवर नजर राहणार आहे. छुप्या कॅमेऱ्याद्वारे टवाळखोरांचे चित्रीकरण होणार असून, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी याबाबत माहिती दिली.
बारामती येथे आयोजित पोलिसांच्या कार्यक्रमात डॉ. जाधव यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
डॉ. जाधव म्हणाले, ‘‘विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दामिनी पथकाच्या कारवाईनंतर मुली तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करीत. तर एखाद्या मुलीने तक्रार दिल्यास पालक विरोध करीत असत. मात्र, निर्भया पथक कपड्यांमध्ये छुपे कॅ मेरे लावून फिरणार आहे. शिवाय हे पथक पोलिसांच्या गणवेशात नसून साध्या वेशात फिरणार आहे. त्यामुळे पोलीस असल्याचा संशयदेखील कोणाला येणार नाही. कॅमेरे लावून गर्दीच्या ठिकाणी पथक फिरणार आहे. त्यानंतर रात्री कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलेले शूटिंग तपासण्यात येईल. त्या चित्रीकरणामध्ये छेडछाड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जाईल. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेतील. विवाहित पुरुष असल्यास त्याच्या पत्नीला, तर मुलगा असल्यास त्याच्या आईला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात येईल. त्यांना चित्रीकरण दाखवून पहिल्या वेळी ताकीद देण्यात येईल.
मात्र, दुसऱ्या वेळी हा प्रकार झाल्यास मात्र कडक पोलीस कारवाई क्रमप्राप्त ठरेल. या पथकाला खासगी वाहन दिले जाणार आहे. कॅमेरे थोड्याच दिवसांत उपलब्ध होतील. मात्र, खासगी वाहन उपलब्ध करण्यासाठी बारामती शहरातील दानशुरांनी पुढाकार घ्यावा.’’
>1091 महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन
महिलांसाठी १०९१ स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. पूर्वी एकच हेल्पलाइन होती. त्यावर संपर्क साधल्यानंतर पोलीस आयुक्तालयात फोन जात असत. आता मात्र स्वतंत्र लाइन असणार आहे. त्यावर येणारे कॉल ‘रेकॉर्ड’ करण्यात येतील. त्यासाठी स्वतंत्र महिला अधिकारी नेमणूक केली जाईल. तसेच, कॉल घेतल्यानंतर आवश्यक ठिकाणी पोलीस जाऊन कारवाई करतील, असे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी सांगितले.
>१४० जोडप्यांचे संसार टिकविण्यात यश...
विवाहितेला त्रास दिल्याप्रकरणी ३९० तक्रारी ग्रामीण पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी महिला दक्षता समिती, पोलीस, समुपदेशनाच्या माध्यमातून १४० संसार टिकविण्यात यश आले. हे संसार कागदोपत्री टिकविले जात नाहीत, तर पोलीस अचानक घरी भेट देऊन निरीक्षण करतात. खरी परिस्थिती पाहिली जाते. या १४० जोडप्यांचा पोलिसांच्या ‘नांदा सौख्य भरे’ कार्यक्रमात सत्कार करण्यात आला, अशी माहिती कार्यक्रमात डॉ. जय जाधव यांनी दिली.