आता राज्यांमध्ये होणार फिल्म अर्काईव्हस्

By admin | Published: August 24, 2016 01:17 AM2016-08-24T01:17:06+5:302016-08-24T01:17:06+5:30

भारतीय चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा, यादृष्टीने एनएफएआयच्या धर्तीवरच विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘फिल्म अर्काईव्ह’ सुरू करण्यात येणार

Films will now be held in the states | आता राज्यांमध्ये होणार फिल्म अर्काईव्हस्

आता राज्यांमध्ये होणार फिल्म अर्काईव्हस्

Next


पुणे : भारतीय चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा, यादृष्टीने एनएफएआयच्या धर्तीवरच विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ‘फिल्म अर्काईव्ह’ सुरू करण्यात येणार आहेत. चित्रपट संवर्धनाच्या दृष्टीने अर्काईव्ह स्थापन करण्याची इच्छा असलेल्या राज्यांना केंद्राकडून आर्थिक तसेच तांत्रिकदृष्ट्या यंत्रणा उभारण्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी दिली.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनची पुढील रूपरेषा ठरविण्याबरोबरच उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती मित्तल यांनी पत्रकारांना दिली. मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार सुभाष शर्मा, सहसचिव संजय मूर्ती, चित्रपट विभागाचे महासंचालक मुकेश शर्मा, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा आणि डी. जे. नारायण उपस्थित होते.
देशातील एकमेव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे पुण्यात आहे, याच ठिकाणी देशभरासह विदेशातील चित्रपटांचे संकलन करून त्याचे जतन आणि संवर्धन केले जाते. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचेदेखील जतन व्हावे, यासाठी त्या त्या भागातील राज्य सरकारने ‘फिल्म अर्काईव्ह’ स्थापन करण्यासंबंधी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या केरळ आणि कर्नाटक राज्यांकडून असे प्रस्ताव आले आहेत. चित्रपट जतनासाठी प्रादेशिक अर्काईव्ह निर्मित करण्यास इच्छुक राज्यांना केंद्राकडून सहकार्य केले जाईल. तसेच विविध विद्यापीठांसह शैक्षणिक संस्थांमध्ये चित्रपट संवर्धनाच्या दृष्टीने एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता विद्यापीठांशी चर्चा करण्यात आली आहे. यासाठी ४० विद्यापीठांची निवड करण्यात आली आहे.
कंपन्यांना सीएसआरनुसार २ टक्के रक्कम सामाजिक कार्यक्रमांसाठी देता येते, कंपन्यांकडूनही चित्रपटांचे जतन करण्यासाठी निधी स्वीकारला जाईल. अर्काईव्हसाठी खासगीकरणाचाही मार्ग आता खुला करण्यात आला असल्याचे मित्तल यांनी स्पष्ट केले. चित्रपटांचे जतन डिजिटल फॉरमॅटमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
देशविदेशातील विविध भागांमधून चित्रपटांचे संकलन केले जात आहे, कामाच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने एनएफएआयमधील कर्मचारीसंख्येत दुपटीने वाढ करण्याबरोबरच कोथरूडच्या एनएफएआयमध्ये नवीन व्हॉल्टस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.
>आकाशवाणी आणि पीआयबी कायम राहणार
पुण्यातील आकाशवाणीसह पीआयबीचे केंद्र बंद होणार, यावरून वाद निर्माण झाले. मात्र, दोन्ही केंद्र बंद किंवा स्थलांतरित होणार नाहीत. आकाशवाणीच्या पुणे वृत्तविभागासह प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण मित्तल यांनी दिले.

Web Title: Films will now be held in the states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.